सावधान..! महाराष्ट्रासह देशभरात कोरोना रूग्णांची झपाट्याने वाढ
गेल्या २४ तासांत देशामध्ये ७,८३० कोरोना रूग्ण
Covid-19 : भारतात दिवसोंदिवस कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. रोज कोरोना रूग्णांचा धडकी भरवणारा आकडा समोर येत आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात मोठ्यासंख्येने कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. २२३ दिवसांतील हा सर्वात मोठा आकडा असल्याचे सांगितले जात आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशामध्ये ७,८३० कोरोना रूग्ण आढळले आहेत. कोरोना रुग्णांचा हा आकडा २२३ दिवसांतील सर्वाधिक आहे.
मंगळवारी आढळलेल्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारीनंतर देशातील सक्रिय रूग्णांची संख्या ४० हजारांच्या वर गेली आहे. तर गेल्या २४ तासांत संसर्गामुळे १६ कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आता देशात ४०,२१५ सक्रिय रूग्ण आहेत. यामधील काही कोरोना रूग्णांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर काही घरी राहून उपचार घेत आहेत.
दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये प्रत्येकी दोन कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला. तर उत्तर प्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र, हरियाणा आणि गुजरातमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये पाच कोरोना रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. देशात आतापर्यंत ५ लाख ३१ हजार १६ लोकांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.