ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भारतातच नव्हे, तर विदेशातही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

आस्ट्रेलिया, इंग्लंड व अमेरिका या देशांतही ३०० मूर्तींची विक्री

अहमदनगर : विघ्नहर्ता गणरायाच्या स्वागताची सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. केवळ भारतातच नव्हे, तर विदेशातही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. त्यात नगरच्या गणेश मूर्तींना देश-विदेशांतून मोठी मागणी आहे. नगर शहरातील गणपती कारखान्यांमधून आतापर्यंत ८० हजार गणेश मूर्तींची विक्री झाली आहे. आस्ट्रेलिया, इंग्लंड व अमेरिका या देशांतही ३०० मूर्तींची विक्री झाली असल्याची माहिती येथील गणपती कारखानदारांनी दिली.

नगरच्या गणेश मूर्तींना देशभरात मोठी मागणी आहे. त्यामुळे येथील गणेश मूर्ती कारखानदार वर्षभर मोठ्या जोमाने मूर्ती तयार करण्याचे काम करतात. अगदी सहा इंच ते २५ फूट उंचीच्या लाखो गणेश मूर्ती या कारखान्यांमधील कारगिर तयार करतात. दरवर्षी प्रमाणेच यंदाही मोठ्या उत्साहात गणरायाचे स्वागत होणार आहे. त्यात आगामी विधानसभा निवडणुकीमुळे या उत्सवावर राजकीय नेत्यांची छाप असणार आहे.

त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा गणेश मूर्तींची मागणी देखील वाढली आहे. नगर शहरातील दीडशे गणपती कारखान्यांमध्ये दीड लाख मूर्ती तयार आहेत. त्यापैकी ८० हजार गणेश मूर्तींची विक्री झाली आहे. महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, गुजरात, तेलंगणा, कर्नाटक या राज्यांतून येथील गणेश मूर्तींना मागणी आहे. विशेष म्हणजे इंग्लंड, अमेरिका व आॅस्ट्रेलिया या देशातून देखील येथील मूर्तींना मागणी आहे. या देशात ३०० मूर्तींची विक्री झाली आहे. मुंबई व पुणे येथून सर्वाधिक मागणी आहे. येत्या दहा-बारा दिवसांत आणखी लाखभर मूर्तींची विक्री होणार असल्याचा येथील कारखानदारांचा अंदाज आहे.

रामलल्ला’ मूर्तीला मागणी

दरवर्षी लालबागचा राजा आणि दगडूशेठ गणपती मूर्तीला मोठी मागणी असते. यंदा देखील ही मागणी कायम आहे. परंतु यंदा अयोध्या मंदिर आणि प्रभू श्रीरामांच्या रूपातील ‘रामलल्ला’ मूर्तीला मोठी मागणी आहे. त्याचबरोबर सिंह बैठक, ताडदेवचा राजा, कृष्ण प्रभावळ, साईबाबा गणेश या मूर्ती मागणीनुसार तयार करण्यात आलेल्या आहेत. या मूर्तींनाही चांगली मागणी आहे.

तीन हजार कारागिरांची कला

नगर शहरातील दीडशे कारखान्यांमधील सुमारे तीन हजार कारागीर वर्षभर दिवसरात्र काम करून बाप्पांच्या आकर्षक मूर्ती घडवतात. आकर्षक रंगकाम, रेखीव बांधणी आणि मूर्तींच्या डोळ्यांमधील बोलके भाव हे येथील मूर्ती कारगिरांचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच येथील मूर्तींना देश-विदेशातून मोठी मागणी आहे. मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांना आॅर्डरनुसार मूर्ती तयार करून दिल्या जातात.

दृष्टिक्षेपात…

एकूण कारखाने – १५०

कारागीर – ३,०००

तयार मूर्ती – १,५०,०००

मूर्तींची विक्री – ८०,०००

विदेशात मूर्ती – ३००

मूर्तींची किंमत –

१०० ते १ लाख

यंदाचा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गणेश मूर्तींची मागणी वाढली आहे. मूर्ती तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, तसेच इंधन दरात वाढ झालेली आहे. त्याप्रमाणात गणेश मूर्तींच्या किमती वाढलेल्या आहेत. आतापर्यंत ८० हजार मूर्तींची विक्री झाली असून, आणखी लाखभर मूर्तींची विक्री होईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button