काही राज्यात निवडणुका असूनही कमी रुग्णसंख्या, राज्यात लसीकरण संथगतीने- देवेंद्र फडणवीस
![In some states, despite elections, the number of patients is low, vaccination is slow in the state - Devendra Fadnavis](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/Devendra-Fadnavis.jpg)
नागपूर – नागपूरमधील कोरोना आणि लॉकडाऊनबाबत आज पालकमंत्री नितीन राऊत यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकील माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा उपस्थित आहेत. “लॉकडाऊन हा पर्याय नाही, मात्र सात दिवस लॉकडाऊन केले आहे, प्रशासनाला वाटत असेल लॉकडाऊन लावले पाहिजे तर आम्ही टोकाची भूमिका घेणार नाही”, असं देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीआधी सांगतिलं.
देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीला हजेरी लावण्यापूर्वी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले, “नागपुरात मोठ्या प्रकरणात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. गेल्या दोन तीन दिवसात मृत्यू संख्यादेखील वाढत आहे. या अनुषंगाने नागपुरात आज पालकमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे. आम्ही या बैठकीला आलो आहे, तात्काळ काय उपाययोजना करता येईल या अनुषंगाने या बैठकित चर्चा केली जाणार आहे”
विशेषतः रुग्णसंख्या वाढत असताना ज्यांना रुग्णालयाची गरज आहे त्यांना बेड्स उपलब्ध झाले पाहिजे. रुग्णालयाच्या बिलाचा प्रश्न पुन्हा एकदा पुढं आला आहे. यावर सोल्यूशन या बैठकीत काढलं जाईल. जे काही जनतेसाठी करता येईल ते करू. लॉकडाऊन हा पर्याय नाही, मात्र सात दिवस लॉकडाऊन केले आहे. प्रशासनाला वाटत असेल लॉकऊन लावले पाहिजे तर आम्ही टोकाची भूमिका घेणार नाही. मात्र त्याचा योग्य उपयोग झाला पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
देशातल्या इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मी यातला तज्ज्ञ नाही, मात्र काही राज्यात निवडणुका असतानाही तिथे रुग्णसंख्या कमी आहे. महाराष्ट्रात लसीकरण संथ गतीने सुरू आहे, ही गती वाढविली पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं.
नागपुरातील लॉकडाऊन
नागपूरमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने पुन्हा लॉकडाऊन करण्याची घोषणा पालकमंत्री नितीन राऊत यांनी 11 मार्चला केली होती. नागपूरमध्ये 15 ते 21 मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन लावण्यात येईल, असं नितीन राऊत म्हणाले होते.
मिनी लॉकडाऊनचा परिणाम नाही
नागपूर शहरात 14 तारखे पर्यंत मिनी लॉकडाऊन लावण्यात आला होता. मात्र त्याचा फारसा परिणाम झाला नसल्याचं दिसून आलं. शनिवार आणि रविवार दोन दिवस बंद ठेवण्याचं आवाहन प्रशासनाने करण्यात आलं होतं. याला व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद देत मार्केट बंद ठेवले मात्र रस्त्यावर विना कामाचे फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली नाही, त्यामुळे नागपुरात आता पुन्हा 7 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे.
नागपूरमध्ये काय सुरु काय बंद?
मद्य विक्री बंद
डोळ्यांचे दवाखाने, चष्म्याची दुकानं सुरु
लसीकरण सुरु राहणार
खासगी कंपन्या बंद, सरकार कार्यालये 25 टक्के कर्मचाऱ्यांसह सुरु राहणार