‘महात्मा गांधी स्मारकाचे काम दोन महिन्यात सुरू करा अन्यथा लोकवर्गणीतून स्मारक उभे करू’; इम्रान शेख
महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रवादी युवकचे जोरदार आंदोलन
![Imran Shaikh said that the work of Mahatma Gandhi memorial should be started in two months](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/Imran-Shaikh-PCMC-780x470.jpg)
पिंपरी : संपुर्ण देश राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची १५४ वी जयंती साजरी करत असताना पिंपरी चिंचवड शहरात अद्याप महात्मा गांधीजींचे स्मारक नसल्याचे सांगत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने नियोजित महात्मा गांधीजींच्या स्मारकाच्या जागेवर आंदोलन केल गेले. शहराध्यक्ष तुषार कामठे, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख महिला अध्यक्ष ज्योती निंबाळकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केले गेले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या आंदोलनास पाठिंबा देत भाजपच्या अनागोंदी कारभारावर जोरदार टीका केली. सत्ताधारी भाजपाला महात्मा गांधी यांच्या नावाची ॲलर्जी असून स्मारक बनविण्यासाठी जागा देण्यास टाळाटाळ केली होती. परंतु लोकांच्या मागणीमुळे जागा दिली असल्याची टीका करत स्मारकाचे काम त्वरित झाले पाहिजे अशी मागणी कामठे यांनी केली.
हेही वाचा – राज्यात पुढील ४८ तासात पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्याचा इशारा
यावेळी बोलताना युवक शहराध्यक्ष इम्रान शेख म्हणाले “राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची हत्या करणारा नथुराम गोडसेला आदर्श मानणारे व त्याचे उदात्तीकरण करणाऱ्यांची सत्ता गेले पाच वर्षे या महापालिकेत होती. त्यांनीच जाणीवपूर्वक गांधीजींचे स्मारकाचे काम रोखले असल्याची टीका इम्रान शेख यांनी केली. गेल्या दहा वर्षापासून शहरातील गांधी प्रेमी यांच्या पाठपुराव्याला महापालिका सातत्याने केराची टोपली दाखवत असून आता यापुढे राष्ट्रवादी युवक काँग्रेस शांत बसणार नाही.येणाऱ्या तीन महिन्यात महापालिका आणि बिर्ला ग्रुप यांनी स्मारकाचे काम सुरू केले नाही तर शहरातील गांधीप्रेमी यांना घेऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेस गांधीजींनीच दाखविलेल्या सविनय कायदेभंगाच्या मार्गाने जागेचा ताबा घेत लोक वर्गणीतून स्मारक उभे करण्याची भूमिका घेईल असा इशारा इम्रान शेख यांनी दिला.
यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, महिला अध्यक्ष ज्योती निंबाळकर, विद्यार्थ्याध्यक्ष राहुल आहेर, ओबीसी अध्यक्ष विशाल जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले व महापालिकेच्या कारभारावर टीका केली.
यावेळी शहरातील गांधीवादी नेते बि आर माडगूळकर, प्रोफेसर बी डी खरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संदीप चव्हाण, अनिल भोसले, राजेश हरगुडे, विजय पिरंगुटे, सुदाम शिंदे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ओम शिरसागर, विकास कांबळे शाहिद शेख,रजनीकांत गायकवाड, मेघराज लोखंडे, पियूष अंकुश,मयूर खरात अजय पवार, राहुल नेवाळे, प्रशांत सकपाळ, शारदा चौकसी, रेखा मोरे,अलका कांबळे,जयश्री झेंडे या महिला पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने युवक पदाधिकारी उपस्थित होते.