अल्पवयीन मुलगा-मुलगी गाडी चालविताना आढळल्यास पालकांना २५ हजार रूपये दंड
वयाच्या २५ वर्षे पूर्ण होईपर्यंत मिळणार नाही वाहन चालविण्याचा परवाना
![If a minor boy or girl is found driving, parents will be fined Rs. 25,000](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/minor-boy-driving-780x470.jpg)
पुणे : अल्पवयीन मुलगा अथवा मुलगी गाडी चालविताना आढळल्यास त्यांच्या पालकांना २५ हजार रूपये दंड तसेच त्या अल्पवयीन मुलांना २५ वर्षे पूर्ण होईपर्यंत वाहन चालविण्याचा परवानाही मिळणार नसल्याचे आदेश परिवहन आयुक्त विवेक भीमनवर यांनी राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना (RTO) दिले आहेत.
परिवहन आयुक्त विवेक भीमनवर यांनी परिपत्रकात म्हटले आहे की, १८ वर्षांखालील मुलगा अथवा मुलीस सार्वजनिक ठिकाणी वाहन चालविण्यास परवानगी नाही. याला केवळ ५० सीसीपेक्षा कमी इंजिन क्षमतेच्या दुचाकींचा अपवाद आहे. या दुचाकी १६ वर्षांवरील सर्वांना चालविण्यास परवानगी आहे. अल्पवयीन मुलांनी वाहने चालवू नयेत, यासाठी कारवाईच्या सूचना परिवहन विभागाकडून सातत्याने केल्या जात आहेत. त्याचे पालन होत नसल्याचे दिसून आले आहे. यामुळे यापुढे या नियमांचे पालन काटेकोरपणे करावे. सर्व आरटीओंनी अल्पवयीन वाहन चालविणाऱ्या अल्पवयीन मुलांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.
हेही वाचा – पोस्ट ऑफिसच्या ‘या’ ३ जबरदस्त योजना! कमी जोखीम मध्ये अधिक परतावा
मोटार वाहन कायदा काय आहे?
मोटार वाहन कायदा (सुधारित) २०१९ नुसार, अल्पवयीन मुलगा अथवा मुलगी गाडी चालविताना आढळल्यास त्यांच्या पालकांना तुरूंगवास होऊ शकतो. हा तुरूंगवास तीन वर्षांपर्यंत आहे. याचबरोबर २५ हजार रूपये दंडाचीही तरतूद आहे. तसेच, त्या अल्पवयीन मुलाला वयाची २५ वर्षे पूर्ण होईपर्यंच वाहन चालवण्याचा परवाना मिळणार नाही.