Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

‘जिवंत माणसाच्या शरीरात मी विष जाऊ देणार नाही’, भेसळीविरोधात तुकाराम मुंढेंची स्पष्ट भूमिका

Maharashtra FDA Commissioner Tukaram Mundhe: राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार घेतल्यानंतर राज्यभरात तुकाराम मुंढे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. अन्नपदार्थातील भेसळ रोखण्यासाठी प्रचलित कायद्याचा वापर करून त्यांनी सध्या राज्यात कारवाईचा धडाका लावला आहे. भेसळ करणाऱ्यांवर दररोज धाडी पडत असून कोट्यवधींचा माल जप्त आणि नष्ट केला जात आहे. अन्न, औषधे, दूध, खवा भेसळ करणाऱ्यांवर कठोर कावाईचा बडगा उगारत मुंढेंनी अनेकांना जेलमध्ये पाठवले आहे. एवढेच नव्हे तर काही मोठ्या कंपन्या, उद्योग, हॉटेलवरही त्यांनी कारवाई केली आहे.

तुकाराम मुंढे यांची धडाकेबाज वृत्ती केवळ याच विभागात नाही तर यापूर्वी त्यांना ज्या ज्या विभागाची जबाबदारी मिळाली होती, त्या सर्व ठिकाणी त्यांनी अशीच कामगिरी केली होती. अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाच्या कामकाजाबाबत त्यांनी नुकतीच आपली भूमिका मांडली आहे. न्यूज १८ मराठी या वृत्तवाहिनीच्या पॉडकास्ट मुलाखतीत त्यांनी भेसळ, त्याविरोधातील कायदे आणि कारवाई याची सविस्तर माहिती दिली.

अन्नपदार्थांचा आणि चुकीच्या जीवनशैलीचा मानवाच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचे तुकाराम मुंढे यांनी या मुलाखतीत सांगितले. ते म्हणाले, “भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर विकासाचे अनेक टप्पे गाठले. भारतातील लोकांचे सरासरी आयुष्यमान वाढले आहे. जीवनमान उंचावले असले तरी त्याचा दर्जा वाढलेला नाही. स्वातंत्र्यावेळी संसर्गजन्य रोगांचे प्रमाण अधिक होते. ते आता खूप कमी झाले आहे. पण जीवनशैलीशी निगडित आजारांचे प्रमाण ६० ते ७० टक्क्यांच्या पुढे गेले आहे.”

हेही वाचा –  राज्यपालांच्या उपस्थितीत कचरावेचक महिलांसाठी ‘टीबी मुक्त मुंबई’ अभियान

चांगली जीवनशैली म्हणजे फक्त व्यायाम करणे एवढेच नसते. तर त्याबरोबरच आपण काय खातो आणि काय पितो, हेदेखील महत्त्वाचे असते. यावर आपले आयुष्य, आपले शरीर निगडित असते. या सर्व गोष्टींचा संबंध अन्न व औषध प्रशासनाशी आहे. पूर्वी आपण घरात खावे आणि बाहेर खेळण्यासाठी जावे, असे म्हणत होते. आज उलट झाले आहे. लोक आज बाहेर जेवायला जातात आणि करमणूक म्हणून घरातच टीव्ही पाहतात किंवा गेम खेळतात. यामुळे मानवी शरीरावर गंभीर परिणाम होत आहेत, असे तुकाराम मुंढे म्हणाले.

“अन्न व प्रशासन विभागाचा संबंध नवजात बालकापासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वांशी येतो. दूध पिण्यापासून ते अन्नाच्या सेवनापर्यंत ते औषध घेण्यापासून ते उपचारापर्यंत आमच्या विभागाचा संबंध येतो. त्यामुळे मी काम करत असताना कुणा संस्थेवर कारवाई करत नाही, तर माझ्या कारवाईमागे कुणाचा तरी जीव वाचविण्याची भूमिका असते. एखाद्या चुकीच्या गोष्टीमुळे कुणीतरी जीव गमावू शकतं, तर योग्य गोष्टीमुळे जीव वाचू शकतात. त्यामुळेच जिवंत शरीरात मी भेसळीच्या माध्यमातून विष जाऊ देणार नाही”, असा निर्धार तुकाराम मुंढे यांनी या मुलाखतीत व्यक्त केला.

तुकाराम मुंढे यांनी यावेळी ग्राहकांनाही एक महत्त्वाचे आवाहन केले. “मी आयुक्त म्हणून माझी जबाबदारी पार पाडत आहे. आमचा विभागही योग्यरितीने कारवाई करत आहे. मात्र आता ग्राहकांनीही जागृत व्हायला हवे. आपण जी गोष्ट विकत घेतो, ती योग्य आहे की अयोग्य, हे पाहायलाच हवे. तसेच आपण जे खात आहोत, त्यात कोणते पदार्थ आहेत, हे पाहायला हवेच. आपण कपडे विकत घेताना जितकी काळजी घेतो, त्यापेक्षा अधिक काळजी अन्न, औषध घेताना जागरूक राहावे”, असे आवाहन तुकाराम मुंढे यांनी केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button