“२०१९ मध्ये माझ्यावरही भाजपामध्ये जाण्यासाठी दबावतंत्र वापरले, पण…”, नवाब मलिकांच्या अटकेनंतर जयंत पाटलांचा गंभीर आरोप
![“२०१९ मध्ये माझ्यावरही भाजपामध्ये जाण्यासाठी दबावतंत्र वापरले, पण…”, नवाब मलिकांच्या अटकेनंतर जयंत पाटलांचा गंभीर आरोप](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/jayant-patil.jpg)
मुंबई |
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर भाजपावर गंभीर आरोप केला आहे. २०१९ मध्ये माझ्यावरही भाजपामध्ये जाण्यासाठी दबावतंत्र वापरले गेले, असा आरोप जयंत पाटील यांनी केला. तसेच माझ्यावर दबावतंत्र वापरलं गेलं, तरी पण मी शरद पवार यांची साथ सोडली नाही, असंही त्यांनी नमूद केलं. ते सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या तिसऱ्या दिवशी करमाळा येथील सभेत बोलत होते.
जयंत पाटील म्हणाले, “महाराष्ट्रात कधीच सुडाचे राजकारण नव्हते, मात्र सध्या राज्यात सुडाचे राजकारण सुरू आहे. आज जरी जनता हे पाहत असली तरी जनता योग्य वेळी मत व्यक्त करेल. सध्या राज्यात चुकीचे वातावरण फोफावत आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना कारण नसताना ईडीने अटक केली आहे. कोणत्याही प्रकारे महाविकास आघाडी सरकार पाडायचे यासाठी राज्यातील काही जण कार्यरत आहेत.”
- “२०१९ मध्ये माझ्यावरही भाजपामध्ये जाण्यासाठी दबावतंत्र”
“कोणताही संबंध नसताना, कोणतंही कारण नसताना, कोणतीही माहिती न देता केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरुन धाडसत्र, अटकसत्र राबवलं जात आहे. हे काही योग्य नाही. सध्या दबावतंत्राचे राजकारण केले जात आहे. २०१९ मध्ये माझ्यावरही भाजपामध्ये जाण्यासाठी दबावतंत्र वापरले गेले, पण मी शरद पवार यांची साथ सोडली नाही,” असं म्हणत जयंत पाटील यांनी भाजपावर आणि मोदी सरकारवर गंभीर आरोप केला.
- “कोणत्याही दबावाखाली न येता काम करा”
“आज आपला पक्ष सत्तेत आहे. आपणही कोणत्याही दबावाखाली न येता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार यांचे विचार मोठ्या प्रमाणात पसरवण्यासाठी काम करा. आपल्या बुथ कमिट्या ताकदवान करा,” असं आवाहनही जयंत पाटील यांनी केले.
- “सरकारने कोविडच्या काळात चांगले काम केले”
जयंत पाटील म्हणाले, “आपण सर्वांनी मोठी मेहनत घेऊन अपक्ष म्हणून संजय शिंदे यांना करमाळ्यातून निवडून दिले. आज संजय शिंदे एक लोकाभिमुख काम या भागात करत आहे. महाविकास आघाडी सरकार गेल्या दोन वर्षांपासून राज्यात कार्यरत आहे. सरकारने कोविडच्या काळात चांगले काम केले. तसेच विकासकामात कोणताही खंड पडू नये याची खबरदारी घेतली.” “करमाळ्यातील पाण्याच्या व्यवस्थेसाठी वारंवार बैठका संजय शिंदे यांच्या नेतृत्वात मुंबईत घेतल्या. येत्या काळात इथले पाण्याचे सर्व प्रश्न सोडवण्याचे काम केले जाईल,” असे आश्वासनही जयंत पाटील यांनी यावेळी दिले.