मनमाडजवळ वाहन अपघातानंतर हायड्रोजन सिलिंडरचे स्फोट
![Hydrogen cylinder explosion after vehicle accident near Manmad](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/New-Project-2022-10-08T172725.685-780x470.jpg)
इंदूर-पुणे राज्य महामार्गावर शनिवारी दुपारी मालेगावहुन मनमाडकडे येणाऱ्या हायड्रोजन सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या मालवाहतूक गाडीचे कानडगाव फाट्याजवळ टायर फुटल्याने ती रस्त्याच्या बाजूला शेतात उलटल्याने आग लागली. या गाडीत जवळपास ३०० सिलिंडर भरलेले होते. यामुळे अग्नितांडव निर्माण झाले. सिलिंडर हवेत रॉकेटसारखे उडाले. भीषण अग्नी तांडवामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊन जवळपास चार किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या.
जाणाऱ्या मालवाहतूक गाडीचे टायर अचानक फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती रस्त्याच्या कडेला शेतात उलटून पेट घेतला. यावेळी झालेल्या स्फोटात सिलिंडर अक्षरशः रॉकेटसारखे १०० फुटापर्यंत उडाले. त्यांचे जोरदार आवाज झाले. त्यामुळे शहर परिसरातील नागरिकांनी बघण्यासाठी गर्दी केल्याने पोलिसांना कसरत करावी लागत होती. गॅस भरलेली मालमोटार सूरतहून मनमाडमार्गे औरंगाबादकडे निघाली होती. टायर फुटल्यानंतर रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात ती कलंडली आणि सिलिंडरचे एकापाठोपाठ स्फोट होऊ लागले. चालक रणजीतकुमार याने प्रसंगावधान राखत उडी मारली. त्यात तो किरकोळ जखमी झाला. या घटनेनंतर मनमाड, चांदवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही बाजूची वाहतुक बंद केली. उशिरापर्यंत वाहतूक ठप्प होती. घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते, चांदवडचे सहाय्यक निरीक्षक रविंद्र जाधव, महामार्ग पोलिस अधिकारी तृष्णा गोपनारायण आदी उपस्थित होते.