‘एमपीएससी’चा ऐतिहासिक निर्णय, अचानक जागांमध्ये मोठी वाढ केल्याने…

नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची ही आनंदाची बातमी आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही महाराष्ट्र राजपत्रित संयुक्त सेवा पूर्वपरीक्षा २०२५च्या परीक्षेसाठी अर्ज केलेला नसेल तर तात्काळ करावा. कारण आयोगाने पदसंख्येत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता एकूण ६०५ पदांसाठी प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळे अनेकांना नोकरीची संधीही मिळणार आहे.
राज्य उत्पादन शुल्क उपअधीक्षक संवर्गातील एक, राज्य उत्पादन शुल्क सहायक आयुक्त संवर्गातील एक, सहायक प्रकल्प अधिकारी, संशोधन अधिकारी संवर्गातील चार पदे, कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नावीन्यता मार्गदर्शन अधिकारी संवर्गातील पाच पदांचा समावेश आहे. तसेच, वन सेवेतील वन क्षेत्रपालांच्या १४४ पदांचा समावेश आहे.
हेही वाचा – पुण्यात ‘माजी सैनिक किसान एकता शिखर संघा’ची स्थापना; ४०० प्रतिनिधींचा एल्गार
सुधारित मागणीपत्रानुसार राज्यसेवेअंतर्गत पोलीस उपअधीक्षक, सहायक पोलीस आयुक्त संवर्गाची चार पदे, सहायक राज्य कर आयुक्त संवर्गाची ७९ पदे, कामगार आयुक्त एक पद, कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नावीन्यता विभाग सहायक आयुक्त संवर्गाची दोन पदे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी संवर्गाची २१ पदे, राज्य उत्पादक शुल्क अधीक्षक तीन पदे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प उपसंचालक, प्रकल्प अधिकारी संवर्गाची ११ पदे, मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी संवर्गातील तीन, सहायक गटविकास अधिकारी संवर्गाच्या १५ पदांचा समावेश आहे.
जागांमध्ये मोठी वाढ करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्य शासनाकडून अनेक जागांचे मागणीपत्र पाठवण्यात आले होते. यानुसार जागांमध्ये ही वाढ करण्यात आली आहे. यासंदर्भात आयोगाने शुद्धीपत्रक जाहीर करून नव्याने जागांची आखणी केली आहे. अनेक विभागाच्या जागांचा समावेश पहिल्या जाहिरातीमध्ये नव्हता. त्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजी होती. वनविभागातील जागांवरून विद्यार्थ्यांनी निवेदनही दिले होते. त्यानंतर आता शासनाने नव्याने मागणीपत्र देत आयोगाकडून नवीन जागा भरण्याची विनंती केली आहे. त्यानुसार एकट्या वनविभागातील १४४ जागांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही उत्तम संधी आहे.




