‘सर्वसामान्यांना अत्युच्च दर्जाची आरोग्यसेवा’; मंत्री चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil : पुण्यातील सर्वसामान्य नागरिकांना अत्युच्च दर्जाच्या वैद्यकीय सेवा मिळाव्यात, यासाठी ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालया’शी संलग्न ७०० खाटांचे अत्याधुनिक, मल्टिस्पेशालिटी रुग्णालय रुग्णालयाचे काम प्रगतिपथावर असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण चंद्रकांतदादा पाटील यांनी दै. ‘प्रभात’शी बोलताना दिली.
पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘प्रभात’ने चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी संवाद साधला, त्या वेळी बोलत होते. ते म्हणाले, “पुणेकरांनी भारतीय जनता पार्टीकडे २०१७ मध्ये प्रथमच महापालिकेचा कारभार सोपविला. तेव्हा भाजपाने केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या सहकार्याने महापालिकेचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे ठरविले.
एवढेच नाही, तर ते विक्रमी वेळेत सुरू करून दाखविले. या महाविद्यालयाशी संलग्न अत्याधुनिक रुग्णालयाची उभारणी हा त्याच्या पुढचा टप्पा होता. या रुग्णालयाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच झाले असून, राजा बहादूर मिल रस्त्यावरील नायडू सांसर्गिक रुग्णालयाच्या जागेवर त्याचे काम सुरू करण्यात आले आहे.’’
हेही वाचा – नायलॉन मांजाचा साठा बाळगणाऱ्या कोणत्याही विक्रेत्यास २ लाख ५० हजार रुपये दंड
भाजपाच्या प्रचाराबाबत बोलताना ते म्हणाले, की भाजपाच्या पाच वर्षांच्या कामगिरीबाबत सर्व समाज घटकांतील मतदार समाधानी आहेत. मेट्रोमुळे पुणेकरांना आरामदायी, सुरक्षित आणि वेगवान प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. चोवीस तास समान पाणीपुरवठा योजनेचे काम प्रतिपथावर आहे. त्यासाठी उपनगरांमध्ये ८२ पाणी टाक्या बांधण्याचे बहुतांश काम पूर्णत्वास गेले आहे. वाहतूक कोंडीमुक्त पुण्यासाठी उड्डाणपूल, भुयारी मार्ग, रुंदीकरण अशी हजारो कोटींची कामे सुरू आहेत. प्रदूषणमुक्त पुण्यासाठी, स्वच्छ हवेसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था इलेक्ट्रिक बसगाड्यांची करीत आहोत. या सर्व कामांमुळे मतदारांचा पाठिंबा वाढत असून, ‘भाजपालाच पुन्हा संधी देणार,’ असे पुणेकर अगदी मनापासून सांगत आहेत.
सर्वसामान्य पुणेकरांचे स्वतःचे परवडणाऱ्या, स्वस्त घराचे स्वप्न भारतीय जनता पार्टीच पूर्ण करू शकते, असेही चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. गेल्या पाच वर्षांत ‘प्रधानमंत्री आवास योजने’च्या सहा प्रकल्पातून भाजपाने चार हजार पुणेकरांचे घराचे स्वप्न सत्यात उतरविले. पुढच्या पाच वर्षांत या दिशेने आम्ही अधिक जोमाने काम करणार आहोत, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. नुसते घर देऊन भाजपा थांबणार नाही, तर विविध योजनांच्या माध्यमातून घरामध्ये वीज, पाणी, शौचालय आणि पाईपद्वारे स्वयंपाकाचा गॅस देखील देण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“तब्बल ९७ नगरसेवक निवडून देत स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपालाच पसंती असल्याचे मतदारांनी २०१७ मध्ये दाखवून दिले. याचीच पुनरावृत्ती यंदा होणार, याविषयी आम्हाला कसलाही संदेह नाही. विशेषतः महिलावर्गाने शासनाची मदत कशी असते, हे भाजपाच्या राजवटीत अनुभवलेले असल्याने पुण्यातील सर्व महिला मतदार लाडक्या ‘देवाभाऊ’च्या पाठीशी उभे असल्याचा संदेश येत्या १५ तालखेला मतपेटीतून पुन्हा देईल, असा मला विश्वास आहे.”
– चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री




