दोन दिवस होरपळीचे! विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा
![Heat wave warning in Vidarbha](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Heat-Waves-780x470.jpg)
Maharashtra Weather | एप्रिलच्या पहिल्याच आठवडय़ात तापमान वाढू लागले असून काल सोलापुरात राज्यातील सर्वाधिक ४३.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडय़ात पुढील तीन दिवस रात्रीच्या उकाडय़ात वाढ होण्याचा अंदाज आहे. तर राज्यात पुढील दोन दिवस पारा ४० अंशांवरच राहण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात शुक्रवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता. प्रत्यक्षात गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी तापमानात सरासरी ०.५ अंश सेल्सिअसने तापमानात घट झाल्याचे आढळले. शनिवारी मात्र तापमान वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या रविवारी आणि सोमवारी विदर्भात गारपीट होण्याचा, तर मंगळवारी, गुढीपाडव्याच्या दिवशी राज्याच्या बहुतेक भागात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वाऱ्यासह पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. पाऊस झाल्यास कमाल तापमानात किंचित घट होऊ शकते.
हेही वाचा – देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ विधानावरून जयंत पाटलांचं प्रत्युत्तर; म्हणाले..
राज्यात बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे येत आहेत. तसेच रविवारपासून अरबी समुद्रावरूनही बाष्पयुक्त वारे येण्याचा अंदाज आहे. या वाऱ्याच्या संयोगातून विदर्भात रविवारी आणि सोमवारी गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. मंगळवारी, गुढीपाडव्याच्या दिवशी किनारपट्टीवगळता राज्याच्या बहुतेक भागांत मेघगर्जना आणि सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.