देशाचा सांस्कृतिक वारसा संचिताचे काम गोवा करत असल्याबद्दल अभिमान; गोविंद गावडे
![Govind Gawde said that he is proud that Goa is doing the work of collecting the cultural heritage of the country](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/Govind-Gawde--780x470.jpg)
पिंपरी : कला अकादमीच्या माध्यमातून नाट्यप्रयोगी पंढरी समजले जाणारे गोवा तसेच राष्ट्रीय चित्रपट महोत्सव या माध्यमातून देशाचा सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम गोवा राज्य करत असल्याबद्दल अभिमान असलयाचे मत गोवा राज्याचे सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांनी आज येथे व्यक्त केले.
जागतिक मराठी अकादमी आणि डॉ. डी.वाय.पाटील विद्यापीठ, पिंपरी आयोजित १८व्या जागतिक मराठी संमेलनामध्ये ‘माझ्या गोव्याच्या भूमीत’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादामध्ये ते बोलत होते. माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, गोव्याचे पत्रकार सागर जावडेकर हे यामध्ये सहभागी झाले होते. महेश केळुस्कर यांनी सर्वांशी याविषयी संवाद साधला.
सांस्कृतिक वातावरण व पर्यटन ही गोव्याची बलस्थाने असून टिकली एवढे वाटणारे हे राज्य भारताच्या विकासात व प्रतिमानिर्मित महत्त्वपूर्ण स्थान टिकवून असल्याचं, गोविंद गावडे म्हणाले.
ज्याप्रमाणे, शेतकऱ्यांच्या जमिनीवर डोळा ठेवून त्यांना अल्प रक्कम देऊन विकासाच्या नावाखाली जमिनी हडप करण्याचे प्रकार सर्वत्र सुरु आहे. तशीच वक्रदृष्टी अलीकडच्या काही वर्षांपासून गोव्यात धनदांडगे करत असल्याची खंत माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांनी व्यक्त केली.
गोवा व महाराष्ट्र ही एकच घरातील दोन भावंडे असून महाराष्ट्राने थोरल्या भावाच्या भूमिकेतून आपल्या धाकट्याकडे लक्ष्य द्यावे व विकास आणि प्रगतीच्या वाट्यामध्ये सहभागी करून घ्यावे, असे गावडे व खलप या दोन्ही मान्यवरांनी म्हटले. डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती व संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ.पी.डी. पाटील यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.