ATM बाबत सरकारकडून बँकांना महत्त्वाचे निर्देश; सायबर अटॅक रोखण्यासाठीही केल्या महत्त्वाच्या सूचना

India vs Pakistan Operation Sindoor : भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढत जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यातच, पुढचे काही दिवस एटीएम सेवा बंद राहणार असल्याचे फेक मेसेजही व्हायरल होत आहेत. या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर वित्तीय सेवा विभागाने बँकांना कोणत्याही सायबर सुरक्षेच्या धोक्यांना तोंड देण्यासाठी आणि बँकिंग सेवा अखंड राहण्यासाठी त्यांच्या अंतर्गत व्यवस्था मजबूत करण्यास सांगितले आहे. बँकांना त्यांच्या शाखा आणि एटीएममध्ये विशेषतः सीमेजवळील भागातील एटीएममध्ये पुरेशी रोख रक्कम उपलब्ध ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
२२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पहलगाम येथे गोळीबार करून निष्पाप २६ पर्यटकांचा जीव घेतला. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारत सरकारने ७ मे पासून पाकिस्तानातील दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळ लक्ष्य केले जात आहेत. ७ मेपासून सातत्याने दोन्ही देशांमध्ये कारवाया सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने बँकांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
“एक आठवड्यापूर्वी आम्ही वित्तीय सेवा विभागाच्या (DFS) सल्ल्यानुसार आमच्या भूमिकेचा आढावा घेतला. आम्ही आमची व्यवस्था मजबूत केली आहे. आयटी आणि ऑपरेशन्सचे सर्व महाव्यवस्थापक आणि उपमहाव्यवस्थापक यांचा समावेश असलेली एक जलद प्रतिसाद पथक स्थापन करण्यात आली आहे. कार्यकारी संचालकांमध्ये मी देखील या पथकाचा भाग आहे”, असे कॅनरा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ के सत्यनारायण राजू यांनी द इंडियन एक्सप्रेसला सांगितले.
हेही वाचा – उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा जोरदार हल्ला
ते म्हणाले की, क्यूआरटी २४×७ शिफ्टमध्ये काम करत आहे, दिवसभर एक उच्चस्तरीय अधिकारी उपलब्ध आहे. ते नियमितपणे बँकेच्या शाखा व्यवस्थित कार्यरत आहेत आणि सर्व एटीएममध्ये पुरेशी रोकड आहे याची खात्री करत आहेत. आम्ही खूप सतर्क आहोत. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दररोज एक बैठक होत आहे. क्यूआरटी कोणत्याही सायबर सुरक्षा धोक्यावर किंवा आमच्या सिस्टममधील प्रत्येक हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे”, असं ते म्हणाले.
युनियन बँक ऑफ इंडियाने सांगितले की त्यांनी एक सक्रिय बहुस्तरीय संरक्षण रणनीती तयार केली आहे आणि ती सर्व रणनीतींवर सतत लक्ष ठेवत आहे. “डिजिटल हा आमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा पोर्टफोलिओ आहे आणि आम्ही सर्व उपाययोजना करत आहोत. आमच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी लक्षात घेता, आम्ही डिजिटल उपक्रम आणि सायबर सुरक्षा क्षेत्रांबाबत सर्व खबरदारी घेत आहोत”, युनियन बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ ए मणिमेखलाई यांनी असं म्हणाले. मणिमेखलाई म्हणाल्या की, डीएफएसने बँकेला एटीएम आणि शाखांमध्ये पुरेशी रोकड ठेवण्यास सांगितले आहे. अर्थव्यवस्था चालू ठेवायची आहे आणि ग्राहक सेवेची देखील काळजी घेतली पाहिजे.”
याशिवाय, सध्याच्या अनिश्चिततेच्या काळात रोख रकमेच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बँका शाखा आणि एटीएममध्ये पुरेशी रोख रक्कम उपलब्ध करून देत आहेत. “आम्ही आमच्या एटीएममधील रोख रकमेचे बारकाईने निरीक्षण करत आहोत. विशेषतः सीमावर्ती भागात कोणताही अडथळा येऊ नये याकरता आम्ही काळजी घेत आहोत”, असं कॅनरा बँकेचे एमडी आणि सीईओ राजू म्हणाले.