पोलिसांवर हल्लाप्रकरणी चारशे जणांविरुद्ध गुन्हा
![Four hundred people charged with assault on police](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/nanded-1.jpg)
नांदेड |
नांदेडमधील गुरुद्वारातून निघणाऱ्या मिरवणुकीत टोळक्याने केलेल्या दगडफेकीत पोलीस अधिकाऱ्यांच्या वाहनांचे नुकसान झाले. येथील सचखंड गुरुद्वार येथे मिरवणुकीवेळी पोलिसांवर झालेल्या शस्त्रधारी जमावाच्या हल्लाप्रकरणी ४०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून रात्रीतून १८ दंगेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या हल्ल्यात दहा जखमी झाले असून यातील चौघा पोलिसांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या टोळक्याने पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक यांच्यावर हल्ला करीत चार वाहनांची नासधूस केली. होळीनिमित्त येथे शीख बांधवांच्या वतीने मिरवणूक काढली जाते. मात्र करोना साथीमुळे नांदेडमध्ये २५ तारखेपासून संचारबंदी लागू करण्यात आलेली असून या मिरवणुकीवरही बंधने आली होती.
मात्र तरीही या मिरवणुकीसाठी जमा झालेल्या एका गटाने पारंपरिक मार्गानेच ही मिरवणूक काढण्याचा आग्रह धरला. या वेळी त्यांनी हाती शस्त्र घेत पोलिसांवर हल्ला करत ते या पारंपरिक मार्गावर उतरले. यामध्ये पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांचे अंगरक्षक दिनेश पांडे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसरे कर्मचारी अजय जाधव यांनाही या हल्ल्यात गंभीर दुखापत झाली. वाढत्या करोना प्रादुर्भावाच्या पाश्र्वाभूमीवर शासनाच्या सूचना लक्षात घेता या मिरवणुकीसाठी परवानगी नाकारत ती रद्द करावी, तसेच पारंपरिक मार्गाने ‘हल्लाबोल’ न करता तो गुरुद्वारा परिसरात आतल्या आत करावा, अशा सूचना संत बाबा नरेंद्रसिंघ आणि संत बाबा बलविंदरसिंघ यांना देण्यात आल्या होत्या. त्यांनीही या सूचनांचा आदर करत त्या मान्यही केल्या होत्या; परंतु एका गटाच्या हेकेखोरपणामुळे ही घटना घडल्याचे पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी सांगितले.
वाचा- लसीकरणात ज्येष्ठांचे हाल; केंद्र तब्बल २० किमी अंतरापर्यंत पायपीट