बेंबळा नदीच्या पुरामुळे पाच हजार हेक्टरचे नुकसान
![Five thousand hectares damaged due to floods in Bembala river](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/vidharbh-1.jpg)
- पालकमंत्र्यांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी
अमरावती |
बेबळा नदीच्या पुरामुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सुमारे ५ हजार ५९५ हेक्टर क्षेत्रात शेतामध्ये पाणी शिरले, असा प्राथमिक अहवाल आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दाभा गावातील पाझर तलावाचे पाणी परिसरातील ३२ घरांत शिरले. धवळसरीच्या ५ आणि टिमटाळा येथील ३ घरांचे पावसामुळे नुकसान झाले. नुकसनाग्रस्तांना सानुग्रह अनुदानाची रक्कम तात्काळ द्यावी, असे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकू र यांनी दिले आहेत. बेबळा नदीला आलेल्या पुरामुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून त्याचे प्रस्ताव शासनाकडे सादर केल्याची माहिती तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांनी दिली.
शिवणी रसुलापूर मार्गावरील बेंबळा व साखळी नदीच्या पुलावरून पाणी गेल्यामुळे परिसरातील शेतीचे नुकसान झाले. ९२ हेक्टर शेतजमीन खरडून निघाली आहे. पुरामुळे शेलू नटवा येथील ४० हेक्टरमधील शेती बाधित झाली आहे. पावसामुळे चांदूर रेल्वे तालुक्यातील खोलाड नदीची पाण्याची पातळी वाढल्यामुळे तालुक्यातील १८० घरांची अंशत: पडझड झाली असून ४ घरे पूर्णपणे पडली आहे. या सर्व नुकसानीबाबत तत्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश यशोमती ठाकूर यांनी दिले. चांदुर रेल्वे तालुक्यातील १६ गावातील अंदाजे ३५० हेक्टरमधील पिकाचे नुकसान झाले असून २० हेक्टर जमीन खरडली आहे, अशी माहिती तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी दिली.
पंचायत समिती सभापती सरिता देशमुख, पळसखेडच्या सरपंच आरती पारधी, उपसरपंच अमोल अडसड आदी उपस्थित होते. कवठा कडू येथील पुलाची उंची वाढविणे, भिलटेक येथे नालाड नाल्याकाठी संरक्षण भिंत उभारण्यात यावी असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. पळसखेड, कवठा कडू, दिघी या गावातील काही भागांची पाहणी करताना पूरपरिस्थितीत संरक्षक असणाऱ्या सर्व उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. अतिवृष्टीग्रस्तांचे पंचनामे पूर्ण करून भरपाईचे प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे निर्देश यशोमती ठाकूर यांनी पाहणी दरम्यान दिले. जिल्ह्य़ातील विविध भागातील पूरपरिस्थितीची पाहणी त्यांनी केली. यावेळी माजी आमदार वीरेंद्र जगताप, उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, कार्यकारी अभियंता विभावरी वैद्य, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान आदी उपस्थित होते.