‘ऑक्सिजन’साठी कोल्हापूर-सातारा आमने-सामने; दोन जिल्हाधिकाऱ्यांमध्ये वाद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/satara-border.png)
सातारा – कोल्हापूर आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यात कोरोना रूग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागली आहे. त्यानंतर आता चक्क सातारा आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी ऑक्सिजन टँकरवरून आमने-सामने आल्याचं समोर आलं आहे.
साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सीमेवरुन जाणारा ऑक्सिजनचा टँकर अडवला. हा टँकर आपल्याच जिल्ह्यासाठी असल्याची भूमिका दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे ऑक्सिजन टँकर मागवण्यात आला होता. पण यातच जिल्हाधिकारी माझं-तुझं केल्यानं ऑक्सिजन टँकर साताराच्या महामार्गावर चार तास अडकून राहिला. तब्बल पोलीस बंदोबस्तासह हा टॅंकर थांबवण्यात आला होता. त्यामुळे महामार्गावर वाहतूकीचा चांगलाच खोळंबा झाला.
त्यानंतर दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी एकमेकांना फोन झाले. त्याच महामार्गावर काही वेळाने आणखी एक टँकर आढळला. शेवटी अडवण्यात आलेला ऑक्सिजन टँकर साताऱ्याचा असल्याचं स्पष्ट झालं. एकाच वेळी दोन टँकर निघाले होते. मात्र एका टँकरचा संपर्क तुटल्यामुळे ही गफलत झाल्याची माहिती सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे .
दरम्यान, संभाषणाच्या गोंधळामुळे हा वाद निर्माण झाला होता, असं अखेर स्पष्ट केलं आहे. सायंकाळी सात वाजता हा टँकर साताऱ्यातील जिल्हा रुग्णालय व जम्बो रुग्णालयात खाली करण्यात आला आहे.