अतिवृष्टी, पूरग्रस्त शेतकरी चार महिन्यानंतरही भरपाईपासून वंचित
![अतिवृष्टी, पूरग्रस्त शेतकरी चार महिन्यानंतरही भरपाईपासून वंचित](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/nagar.jpg)
- शेवगावमधील १९ कुटुंबांचा आत्मदहनाचा प्रयत्न, १२ कोटींच्या वितरणाबद्दल संशय
नगर |
अतिवृष्टी व पुरामुळे शेवगाव, पाथर्डी व नगर तालुक्यातील शेतकऱ्यांची प्रचंड मोठी हानी झाली. मात्र चार महिन्यानंतरही शेतकरी भरपाईपासून वंचित आहेत. भरपाईसाठी पात्र शेतकऱ्यांना वंचित ठेवले जाते, मात्र अपात्र लाभार्थीना भरपाईचे वाटप केले जाते, असा आक्षेप घेत शेवगाव तालुक्यातील १९ कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. शेवगाव तालुक्यासाठी उपलब्ध करण्यात आलेले १२ कोटी रुपये गेले कुठे, असा प्रश्न या वंचित शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. शेवगावमधील कराड वस्ती व लांडे वस्ती येथील रामकिसन कराड, नवनाथ कराड, रामभाऊ लांडे, अलका कराड, त्र्यंबक कराड, गायाबाई कराड, महादेव बडे, तुकाराम बडे, गहीनीनाथ बडे, संजय बडे, एकनाथ बडे, भिमराज बडे, अण्णासाहेब बडे आदींना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.
आत्मदहनासाठी आणलेल्या इंधनाच्या ६ बाटल्या त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आल्या. दि. ३१ऑगस्ट व १ सप्टेंबर या दोन दिवसात शेवगाव, पाथर्डी व नगर तालुक्यात अतिवृष्टी झाली. अनेक नद्यांना पूर येऊन घरांची पडझड झाली. जनावरे वाहून गेली, शेती खरवडून गेली. पिकांचे नुकसान झाले. संसारोपयोगी साहित्य वाहून गेले. या तीन तालुक्यातच ६१ हजार ६३५ शेतकऱ्यांच्या ५३ हजार ११५.५९ मधील १८ कोटी १४ लाख रुपयांचे नुकसान झाले, तर ३६९ हेक्टर शेती खरवडून गेल्याने १ हजार ५५ शेतकऱ्यांचे १ कोटी ३८ लाख रुपयांचे नुकसान झाले. याव्यतिरिक्त संसारोपयोगी साहित्य व गोठय़ातील जनावरे वाहून गेल्याने झालेले नुकसान वेगळेच आहे.
राज्य सरकारने नुकसान भरपाईपोटी ४० टक्के रक्कम उपलब्ध केली आहे. टप्प्याटप्प्याने त्याचे वाटप केले जात आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी आंदोलक शेतकऱ्यांना सांगितले. शेवगाव तालुक्यात अनेक अपात्र शेतकऱ्यांना भरपाई देण्यात आली, मात्र पात्र असूनही कराड वस्ती, लांडे वस्ती येथील १९ कुटुंबे भरपाईपासून वंचित आहेत, त्यांचे पंचनामे महसूल व कृषी यंत्रणेने दडपून ठेवले आहेत. शेवगाव मधील १५० व वडूल्यातील १००, आखेगाव परिसरातील अनेक शेतकरी भरपाई पासून वंचित आहेत, याकडे रामकिसन कराडे यांनी लक्ष वेधले. कोपरगाव तालुक्यात वितरित करण्यात आलेल्या रकमेतील ३० लाख रुपये शिल्लक आहेत, ते शेवगावमधील शेतकऱ्यांना उपलब्ध केले जातील, असे आश्वासन निवासी उपजिल्हाधिकारी निश्चित यांनी दिले.