धुळीकडे दुर्लक्ष करणे भोवले!
पर्यावरण संवर्धन: प्रशासनाने १०५ बांधकाम प्रकल्पांचे काम थांबविले
![dust, neglect, Environment, Conservation, Administration, Construction, Projects, Works,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/12/dhul-pradushan-780x470.jpg)
पुणे : शहरात सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी धुळीचे प्रमाण वाढले आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी उपाय योजना न करणाऱ्या बांधकाम प्रकल्पांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यात पहिल्या दिवशी ९१ बांधकामांचे, तर दुसऱ्या दिवशी १४ बांधकामचे काम थांबविण्यात आले आहे. त्यामुळे या दोन दिवसांत १०५ बांधकाम प्रकल्पाचे काम थांबविले आहे.
शहरात बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या बांधकामामुळे मोठ्या प्रमाणात धुळीचे प्रदूषण होत आहे. त्यामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी बांधकाम व्यावसायिक, वास्तुविशारदांनी उपाययोजना कराव्यात असे आदेश दिले होते. त्यासाठीचे ई-मेल संबंधितांना करून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमावलीचे पालन करण्यास सांगितले होते. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
बांधकाम विभागातील अभियंत्यांनी सर्वेक्षण करून ज्या ठिकाणी धूळ रोखण्यासाठी उपाययोजना केली नाही अशा बांधकाम प्रकल्पांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्या नोटिशीत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम २६७ व महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५४च्या अधिकारानुसार नोटीस मिळाल्यानंतर ताबडतोब बांधकामाचे काम बंद करण्यात यावे. बांधकाम चालू ठेवल्यास आम्हाला प्राप्त असलेल्या अधिकारान्वये काम करणाऱ्या व्यक्तीवर पोलिसांच्या माध्यमातून कारवाई केली जाईल, असे नमूद केले आहे.
दुसऱ्या दिवशी कारवाई मंदावली
धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना न करणाऱ्या बांधकाम प्रकल्पांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यात पहिल्यादिवशी ९१ बांधकामांचे, तर दुसऱ्या दिवशी १४ बांधकामचे काम थांबविण्यात आले आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी कारवाई मंदावली असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.