शिर्डीत नववर्षाच्या स्वागताला पालखी घेऊन येऊ नका, साई संस्थानचे आवाहन
![Don't bring palanquin to welcome New Year in Shirdi, appeal of Sai Sansthan](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/shirdi-sai-baba.jpg)
शिर्डी | टीम ऑनलाइन
शिर्डीत नाताळाची सुट्टी आणि नव वर्षाचे स्वागत साईबाबांच्या दर्शनाने करण्यासाठी मोठी गर्दी होत असते. मात्र, कोरोनाचे संकट अद्यापही कमी झालेले नाही. त्यातच ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या प्रकाराने राज्याची चिंता आणखी वाढवली आहे. अशातच सर्व नियम पायदळी तुडवताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर नववर्षाची सुरुवात म्हणून शिर्डीत पालखी घेऊन येऊ नका, असे आवाहन साईबाबा संस्थानने केले आहे.
तसेच यावर्षी 31 डिसेंबरला साई मंदिर रात्रभर खुले ठेवायचे की नाही, याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येणार असल्याचेही संस्थानने म्हटले आहे.शिर्डीत नाताळाच्या सुट्ट्या, सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त भाविकांची मोठी गर्दी होत असते. मात्र मागील वर्षाप्रमाणेच याही वर्षी कोरोनाचा धोका आहे. शिर्डीत दिवसभरात ऑफलाईन आणि ऑनलाईन पासेसद्वारे पंचवीस हजार भक्तांना दर्शन दिले जाते. त्यामुळे गर्दीच्या काळात भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी साई दर्शनाला येताना भाविकांनी ऑनलाईन दर्शन पास घेऊनच शिर्डीला यावे. यासह पायी पालखी घेऊन येणार्या पदयात्रींनी शिर्डी येथे पालखी आणू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
नाताळची सुट्टी, नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त 25 डिसेंबर ते रविवार 2 जानेवारी 2022 या कालावधीत गर्दी होत असते. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून 31 डिसेंबरला रात्रभर मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले ठेवण्यास साई संस्थानने सुरुवात केली आहे. यावर्षी ओमिक्रॉन या कोरोना व्हॅरिएंटचा धोका आणि मर्यादित भाविकांना दर्शन देण्याची व्यवस्था शिर्डीत केली आहे. येत्या 24 डिसेंबरनंतर आलेला शनिवार आणि रविवार या दिवशी होणार्या गर्दीचे नियोजन साई संस्थान करत आहे.