जीवनातील सर्व समस्यांवर ‘ज्ञानेश्वरी’ हेच रामबाण औषध
सरस्वती व्याख्यानमालाः संत साहित्याचे अभ्यासक डॉ. विजयकुमार फड यांचे प्रतिपादन
!['Dnyaneshwari' is the panacea for all problems in life](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/fad-saraswati-vyakhyanmala-780x470.jpg)
वडगाव मावळ : अबालवृद्धांना जीवनात पुढे पुढे जात असताना प्रत्येक टप्प्यावर अनेक अडचणी समोर ठाकतात. परंतु जीवनातील प्रत्येक समस्येवर ‘ज्ञानेश्वरी’ हेच रामबाण औषध आहे. असे प्रतिपादन संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि आयएएस अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी सरस्वती व्याख्यानमालेत केले. मावळ विचार मंच आयोजित सरस्वती व्याख्यानमालेचे यंदा २३ वे वर्ष असून ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून प्रथम पुष्प गुंफताना आयएएस अधिकारी डॉ. विजयकुमार फड बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोथरूडच्या मा. आमदार मेधाताई कुलकर्णी उपस्थित होत्या. तर अतिथी म्हणून भाजपाचे मा. राष्ट्रीय सचिव सुनिल देवधर आणि प्रमुख पाहुणे म्हणून युवा किर्तनकार हभप जयश्रीताई येवले या उपस्थित होत्या. “धर्म या शब्दापासून सुरू होणाऱ्या भगवद्गगीतेची समाप्ती ‘नीती’ या शब्दाने होते,या दोन शब्दांच्या दरम्यान सांगितलेले ज्ञान हीच सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे” असे डॉ. विजयकुमार फड यांनी पुढे बोलताना सांगितले. “घराघरात स्रीचा सन्मान होईल. तेव्हाच नवरात्रोत्सव साजरा करण्याचे खऱ्या अर्थाने सार्थक होईल”, असे मत युवा किर्तनकार हभप जयश्रीताई येवले यांनी व्यक्त केले.
“देशाच्या पंतप्रधानांनी संसदेच्या नवीन इमारतीमध्ये केंद्रीय कायदेमंडळात महिलांना एक तृतीयांश प्रतिनिधित्व देण्याची घोषणा करून नवभारताच्या उभारणीतील महिलांच्या योगदानाचा पंतप्रधांनी सन्मान केला आहे” असे मत भाजपाचे मा. राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी व्यक्त केले.
पुणे ग्रामिणची सांस्कृतिक राजधानी वडगाव मावळ…
“पुणे शहराची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख आहे तसेच वडगाव मावळची ओळख हे पुणे ग्रामीणची सांस्कृतिक राजधानी, अशी बनत चालली आहे”. असे आपल्या मनोगतात कार्यक्रमाच्या अध्यक्ष मा. आमदार मेधाताई कुलकर्णी यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टींग असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल क्रीडा प्रशिक्षक सुधीर म्हाळसकर यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.
कार्यक्रमास यांची उपस्थिती…
व्यासपीठावर संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर, अध्यक्ष श्रीराम ढोरे, कार्याध्यक्ष अर्चनाताई कुडे, कार्यक्रम प्रमुख सारीकाताई भिलारे आदी मान्यवर उपस्थित होते. सरस्वती व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष श्रीराम ढोरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संस्थापक कार्याध्यक्ष डॉ रविंद्र आचार्य यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन श्री.पोटोबा देवस्थान संस्थानचे विश्वस्त सचिव अनंता कुडे यांनी, मानपत्र वाचन, प्रियाताई राऊत यांनी आणि आभार प्रदर्शन मा. नगरसेवक किरण म्हाळसकर यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.