आज साडेतीन मुहूर्तापैकी एक ‘दिवाळी पाडवा’
मुंबई – दिवाळीतला ‘पाडवा’ हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे. कोरोनाचा काळ असला तरी यंदा दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून हा सण ओळखला जातो. दिवाळीची सुरुवात झाल्यावर लक्ष्मीपूजनानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. पौराणिक महत्त्व असलेल्या आणि कृषिप्रधान संस्कृतीचे प्रतिबिंब दाखवणाऱ्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा दिवाळी पाडव्याचा सण शेतकरी राजा मोठ्या उत्साहाने साजरा करतो. ‘इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’, अशी प्रार्थना या दिवशी केली जाते.
पंचांगकर्ते दाते यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यापारी या दिवशी वहीपूजन आणि दुकानाची पूजा करून नवीन वर्षाचे स्वागत करतात. या दिवशी पत्नीने पतीस ओवाळावे म्हणजे दोघांचेही आयुष्य वाढते. या दिवशी पतीने पत्नीला ओवाळणी म्हणून सोने, साडी किंवा एखादी मोठी भेटवस्तू देण्याची पद्धत आहे. तसेच नवविवाहित दाम्पत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी केली जाते. यालाच दिवाळसण म्हणतात. त्यानिमित्त जावयाला आहेर दिला जातो.
शुभ मुहूर्त
सकाळी ०६. ५० ते १०. ५० मिनिटांपर्यंत.
दुपारी १२.२५ ते १. ४५ मिनिटांपर्यंत.