breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दिलीप वळसे-पाटील राज्याचे नवे गृहमंत्री

मुंबई – ज्येष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची सीबीआयकडून चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर देशमुख यांनी सोमवारी आपल्या गृहमंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलेल्या शिफारसीनुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देशमुख यांचा राजीनामा मंजूर केला असून गृह विभागाचा कार्यभार मंत्री, कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे देण्यास मंजूरी दिली आहे.

सोमवारी उच्च न्यायालयाचा निकाल येताच अनिल देशमुख हे पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी दाखल झाले. त्यावेळी पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनादेखील बोलावून घेतले. तिघांमध्ये पाऊणतास चर्चा झाली. त्यानंतर देशमुख यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविली. शरद पवार यांनीही त्यांना राजीनामा देण्याचा सल्ला दिला. त्यानंतर देशमुख यांच्या राजीनाम्याचे पत्र तयार करण्यात आले. ते घेऊन ते मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी गेले आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनाम्याचे पत्र दिले व नंतर ट्विट करून राजीनाम्याची माहिती सर्वांना दिली. तसेच राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकारांना सांगितले की, देशमुख यांनी स्वत:च शरद पवार यांना भेटून राजीनाम्याची तयारी दर्शविली. त्याला पवार यांनी ‘ग्रीन सिग्नल’ दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटून देशमुख यांनी राजीनामा सोपविला.

दरम्यान, अभ्यासू आणि नम्र लोकप्रतिनिधी अशी ओळख असलेले दिलीप वळसे-पाटील हे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव मतदारसंघाचे सातव्यांदा आमदार आहेत. याआधी त्यांनी उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, ऊर्जामंत्रिपद तसेच विधानसभेचे अध्यक्षपद सांभाळले आहे. आता त्यांना राज्याच्या गृहमंत्रीपदाची जबाबदारी दिल्यानंतर त्यांच्याकडे असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तर उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आलाय.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button