धनगर समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण, आमरण उपोषणाचा आज 10 वा दिवस
सहापैकी तीन उपोषणकर्त्यांची प्रकृती अत्यंत खालावली
महाराष्ट्र : धनगर समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी पंढरपूरमध्ये सकल धनगर समाजाच्या वतीनं सुरु असलेल्या आमरण उपोषणाचा आज 10 वा दिवस आहे. मात्र, शासनाकडून तोडगा काढण्यासाठी वेगाने प्रयत्न होत नसल्याने धनगर समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आंदोलक आता रस्त्यावर उतरुन आपल्या भावना व्यक्त करत आहेत.
सहापैकी तीन उपोषणकर्त्यांची प्रकृती अत्यंत खालावली
आज धनगर आमरण उपोषणाच्या दहाव्या दिवशी एक उपोषणकर्ते माऊली हळणवर यांना चक्कर येवून बेशुद्ध पडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. यामुळं समाजात संताप वाढत चालला आहे. शासनाकडून वाढवून मुदत मागितल्याने या उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण सुरूच ठेवले आहे. सध्या सहा पैकी तीन उपोषणकर्त्यांची प्रकृती अत्यंत खालावलेली असून इतर तिघांची प्रकृती बिघडायला लागली आहे. या उपोषणकर्त्यांनी कोणत्याही शासकीय वैद्यकीय मदत घेण्यास नकार दिला असून प्रकृती बिघडलेल्या उपोषणकर्त्यांना खासगी रुग्णालयात उपचार दिले जात आहेत.
दरम्यान, उपचारासाठी हलवलेले माऊली हळणवर यांची प्रकृती चांगलीच खालवलेली असून त्यांच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आलेले आहेत. उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळत असताना शासनाकडून मात्र हे उपोषण सोडवण्यासाठी म्हणावी तशी कोणतीच हालचाल सुरू नसल्याने आता आंदोलनाला सुरुवात होऊ लागली आहे. आज पंढरपूरमध्ये रास्ता रोको करून शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर माळशिरस येथे पंढरपूर पुणे पालखी मार्गावर शेळ्या मेंढ्या सहित गजी ढोल वाजवत धनगर समाजाने रास्ता रोको करून सरकारचा निषेध केला आहे.