धनंजय मुंडेंचा फोन अन् अँब्युलन्स दोन मिनिटात हजर; पाहा नेमकं प्रकरण काय
![Dhananjay Munde's phone and ambulance arrived in two minutes; See exactly what the case is](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/Dhananjay-Munde.png)
परभणी | बीड येथील शासकीय बैठका आटोपून परत परळीला येत असताना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी रस्त्यात अपघातग्रस्त झालेल्या एका तरुणाचे प्राण वाचवण्यास मदत केली आहे. बीड वरून परळीकडे जात असताना सिरसाळा ते पांगरी दरम्यान एक तरुण दुचाकीस्वार अपघातग्रस्त होऊन रस्त्यावर अक्षरश: रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. हे दृश्य पाहताच धनंजय मुंडे यांनी आपला ताफा तात्काळ थांबवून अपघातग्रस्त तरुणाच्या दिशेने धाव घेतली.
धनंजय मुंडे यांनी त्या तरुणाचा हात पकडून तो शुद्धीत असल्याची खात्री केली. आपले नाव महेश असल्याचे सांगत त्या तरुणाने तो पांगरी (ता. परळी) इथला असल्याचे सांगितले. तरुणाच्या डोक्याला गंभीर जखम झालेली होती. ते पाहून धनंजय मुंडे यांनी तात्काळ आपल्या स्वीय सहाय्यकांना पोलीस व रुग्णवाहिका बोलावण्यासाठी फोन लावायला लावला. धनंजय मुंडे यांनी स्वतः बोलल्यानंतर अगदी दोनच मिनिटात रुग्णवाहिका घटनास्थळी हजर झाली. धनंजय मुंडे यांनी सदर तरुणाला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना दिल्या तसेच रुग्णालय प्रशासनाला देखील याबाबत दक्षता घेण्याबाबत धनंजय मुंडे यांनी सूचना दिल्या.
ताई तुम्ही काळजी करू नका सावकाश अंबाजोगाईला जा…
सदर तरुणास अंबाजोगाईकडे रवाना केल्यानंतर घटनेची माहिती अपघातग्रस्त तरुणाच्या कुटुंबास मिळाली. त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली असता धनंजय मुंडे यांची रस्त्यात भेट झाली. तेव्हा ‘ताई तुम्ही काळजी करू नका सावकाश अंबाजोगाईला जा तो बरा आहे शुद्धीवर आहे बोलतोय रुग्णालयात देखील मी बोललो आहे’, अशी माहिती देऊन त्यांना धीर दिला. तसेच मुंडे यांनी अपघातग्रस्तांच्या कुंटूंबाला अंबाजोगाईला जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था करून दिली.