शिर्डीत साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची कोरोना चाचणी होणार
शिर्डी – राज्य सरकारने सर्वच धार्मिक स्थळे ७ ऑक्टोबर पासून उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात येत नसल्याने शिर्डीतील साई मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सरकारने नवी नियमावली जारी केली आहे. त्यानुसार शिर्डीत येणाऱ्या भाविकांची त्या-त्या ठिकाणी कोरोना चाचणी करून निगेटिव्ह आढळणाऱ्या भाविकालाच मंदिरात प्रवेश मिळणार आहे.
साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणायत यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक नियोजन व आढावा बैठक पार पडली. या बैठकीत नवीन नियमावलीबाबतच्या सूचना देण्यात आल्या. जो भाविक शिर्डीत दर्शनासाठी येईल त्याची संबंधित रेल्वे स्टेशन, विमानतळ आणि वाहनतळावर कोरोना चाचणी केली जाईल. त्यात जो निगेटीव्ह आढळेल त्यालाच मंदिरात दर्शनासाठी परवानगी दिली जाईल.या बैठकीत प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांनाही विशेष सूचना देण्यात आल्या. राहाता व शिर्डीमधील महसूल, पोलीस, आरोग्य, बांधकाम, पालिका, रेल्वे, एसटी, विमानतळ अन्य सर्व शासकीय विभागानी एकमेकांना सहकार्य करत काम करावे.तसेच भाविकांकडून कोरोना नियमांचे पालन होतेय की नाही याची दक्षता घ्यावी असे सांगण्यात आले.