देवेंद्र फडणवीस हसत हसत म्हणाले, मोदींच्यासोबत-अजितदादांच्या मनमोकळ्या गप्पा, राष्ट्रवादीला बघवलं नाही
![फडणवीस हसत हसत म्हणाले, मोदी-अजितदादांच्या मनमोकळ्या गप्पा, राष्ट्रवादीला बघवलं नाही](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/फडणवीस-हसत-हसत-म्हणाले-मोदी-अजितदादांच्या-मनमोकळ्या-गप्पा-राष्ट्रवादीला-बघवलं-नाही.jpg)
मुंबई:पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात देहूत मनमोकळ्या गप्पा झाल्या, त्या काही जणांना बघवल्या नाहीत म्हणून हे सर्व करुन त्या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीवर केला आहे. देहूतील संत तुकाराम महाराज शिळा मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमात अजित पवार यांचं भाषण झालं नाही. त्यावरुन राष्ट्रवादीने भाजपला घेरण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं.
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानंतर भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांना देहूतील कार्यक्रमात अजित पवारांचं भाषण न होणं आणि त्यावर राष्ट्रवादीकडून भाजपचा निषेध करणं यावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना हे सर्व राष्ट्रवादीचं अजितदादांविरोधात षडयंत्र आहे, असं फडणवीस हसत हसत म्हणाले.
- कदाचित अजितदादांविरोधातच हे षडयंत्र- फडणवीस
“अजित पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इतक्या मनमोकळेपणाने बोलत होते, गप्पा मारत होते. पंतप्रधानांनी अजित पवारांची विचारपूस केली. इतकंच नाही तर अजित दादांच नाव नाही हे लक्षात आल्यावर पंतप्रधानांनी स्वत: ‘अरे अजित जी नहीं बोलेंगे, अजित जी आप बोलीये’ असं म्हटलं. त्यानंतर अजित पवारांनी सांगितलं की नाही आपणच बोला. हे सगळं काही लोकांना पाहावत नाहीये. त्यामुळे इतका चांगला कार्यक्रम झाल्यानंतर जाणीपूर्वक अशाप्रकारे त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न होतोय”, असं फडणवीस म्हणाले. तसेच, “मला तर असं वाटतं की कदाचित अजितदादांविरोधातच हे षडयंत्र आहे”, असंही ते हसत हसत म्हणाले.
- देहूच्या कार्यक्रमात अजित पवारांचं भाषण नाही, राष्ट्रवादीकडून रोष व्यक्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहूतील संत तुकाराम महाराज शिळा मंदिर लोकार्पण सोहळा पार पडला. मात्र, या सोहळ्यानंतर राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना पाहायला मिळाला. झालं असं की या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. मात्र, त्या कार्यक्रमात अजित पवारांचं भाषण झालं नाही. इतक्या मोठ्या कार्यक्रमात महाविकास आघाडीच्या नेत्याला भाषणाची संधीच देण्यात आली नाही, असा आरोप राष्ट्रवादीने केला. तर, अजितदादांनीच भाषणाला नकार दिल्याचं भाजपच्या नेत्यांनी सांगितलं.