“बाळासाहेबांच्या आशीर्वादानेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले”; जनाब ठाकरे म्हणणाऱ्या फडणवीसांना खडसेंचे प्रत्युत्तर
!["Devendra Fadnavis became the Chief Minister with the blessings of Balasaheb"; Khadse's reply to Fadnavis called Mr. Thackeray](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/Devendra-Fadnavis-becomes-CM-only-with-Balasaheb-thackeray.jpg)
मुंबई |
जनाब बाळासाहेब ठाकरे म्हणणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रावादीचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीसांनी केलेल वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही मान्य नसावे अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादानेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले असेही एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिल्याने राज्याच्या राजकारण वेगळीच चर्चा सुरु झाली होती.एमआयएमने महाविकास आघाडीबरोबर आघाडी करण्याची योजना मांडली असली तरी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांनी हा प्रस्ताव फेटाळला आहे. याबाबत बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्विकारलेलं आहे असे म्हणत शिवसेनेवर टीका केली होती. त्यावर आता एकनाथ खडसे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “नरेंद्र मोदींनाही देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य मान्य नसावे. देवेंद्र फडणवीस हे बाळासाहेबांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झाले होते. त्या मंत्रीमंडळात मीसुद्धा होतो. आपले राजकीय विचार बाजूला ठेऊन त्यांनी त्यांचा आदर ठेवायला पाहिजे होता. अलिकडे ते जी वक्तव्ये करत आहेत ती नैराश्यातून आलेली असावीत,” असे एकनाथ खडसे यांनी म्हणाले.
- देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?
“आम्ही पाहतो आहोत की सत्तेसाठी ते आणखी काय करतात? तसंही आता शिवसेनेने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्विकारलेलं आहे आणि अजानची स्पर्धा वैगरे सुरू आहे, त्याचा परिणाम आहे का पाहूयात,” असं म्हणत फडणवीसांनी शिवसेनेवर निशाणा साधला होता.
दरम्यान, शिवसेना भवनावर पार पडलेल्या शिवसेनेच्या शिव संपर्क अभियानामध्येही शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमआयएमच्या प्रस्तावाबाबत भाष्य केले होते. “शिवसेनेचं हिंदुत्व महाराष्ट्रभर पोहोचवून एमआयएमचा कट उधळून लावा. मेहबुबा मुफ्ती विसरु नका. एक वेळ अशी होती की, ते मुफ्तीसोबत संसार करत होते, आता ते आपल्याला बोलत आहेत. आपण महाविकास आघाडी म्हणून एक आहोत, महाविकास आघाडीचा धर्म आपल्याला पाळायचा आहे,” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती.