संत तुकोबारायांच्या पालखीचे आज प्रस्थान
![Departure of Saint Tukobaraya's Palkhi today](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/images-2021-07-01T104705.590.jpeg)
पिंपरी |
विठुराया तुझ्या भेटीची आम्हाला आस लागलीय, लाखो वारकऱ्यांच्या जिवाची घालमेल सुरू आहे, लवकरात लवकर कोरोनाचे संकट दूर कर, असं साकडं लाखो वारकरी विठुरायाचरणी घालत आहेत. श्री क्षेत्र देहूतून तुकोबारायांचा पालखी सोहळा आज (गुरुवार दि.०१) मर्यादित वारकऱ्यांसह पंढरीकडे प्रस्थान ठेवत आहे. आषाढी एकादशी जसजशी जवळ येते तसतशी विठुरायाच्या भेटीची आस लाखो वैष्णवांना लागते. वारी म्हणजे वारकऱ्यांसाठी परमोच्च आनंदाचा क्षण. संतांच्या संगतीत पांडुरंगाच्या भेटीला पंढरीला जाण्यासाठी वारकरी वर्षभर आषाढी वारीची आतुरतेने वाट पाहतात. श्री क्षेत्र देहूतून आषाढी वारीसाठी पंढरीकडे प्रस्थान ठेवणाऱ्या श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी देहूत लाखो वारकरी दाखल होत असतात. ३३६ वर्षांपासून पायी वारीची परंपरा आजही अखंडित सुरू असून, मानकरी, सेवेकरी व ३३० दिंड्यांसह पालखी सोहळा पंढरीकडे मार्गस्थ होतो. राज्याच्या कानाकोपऱ्यांतून देहूत दाखल झालेल्या लाखो वारकऱ्यांसह १७ दिवसांच्या मुक्कामानंतर हा सोहळा पंढरपूरला पोहोचतो.
दरम्यान, प्रस्थान सोहळ्याचा दिवस म्हणजे देहूकरांसाठी आनंदी पर्वणीच असते. देहू पंचक्रोशीत उत्साहाचे वातावरणात या सोहळ्याची दोन महिने अगोदरपासून तयारी सुरू होते. पालखी रथाच्या बैलजोडीची निवड करणे, मानकरी, सेवेकरी, दिंडीप्रमुखांना पत्रव्यवहार, शासनाच्या विविध विभागांशी पत्रव्यवहार यासह मुक्कामाच्या ठिकाणची पाहणी तेथील व्यवस्था याची तपासणी करणे, आदी तयारी सुरू असते. वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्याची सेवा केली तरी भगवंताची सेवा घडते, या भावनेतून वारकऱ्यांच्या सेवेसाठी वारकरी उत्सुक असतात. दरम्यान, प्रस्थान सोहळ्याच्या महिनाभर अगोदरपासूनच ही लगबग पहायला मिळते. मात्र, यंदाही काही मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत देहूत गुरुवारी (दि.१) प्रस्थान सोहळा होत आहे.