फॉर्मात तलवारीने केक कट, पुण्यात बर्थडे बॉयचा कारनामा आला अंगलट…
तलवारीने केक कापणं तरुणाला पडलं महागात, आर्म ॲक्ट कलमाअन्वये गुन्हा दाखल
पुणे (इंदापूर) : तलवारीने केक कापणे तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. वाढदिवसाचा केक तलवारीने कापल्याचे फोटो आणि व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास येताच संबंधित तरुणावर पोलिसांनी आर्म ॲक्ट कलमाअन्वये गुन्हा नोंदवत त्याच्याकडील तलवार जप्त केली आहे. सचिन दिलीप सातव (वय २८, रा. बिजवडी ता. इंदापूर) असं या तरुणाचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन सातव याचे त्याच्या वाढदिवशी तलवारीने केक कापत असल्याचे फोटो आणि व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते. इंदापूर पोलिसांना त्याची माहिती मिळताच मंगळवारी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास गुन्हे शोध पथकाने त्याला ताब्यात घेत नोटीस दिली. त्यानंतर त्याच्याकडील तलवार ताब्यात घेतली. या प्रकरणी पोलीस कर्मचारी नंदू जाधव यांनी फिर्यादी दिली. त्यानुसार सातव याच्यावर आर्म ॲक्ट कलम ४ सह २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यात अलीकडच्या काळात तरुणांमध्ये कोयता, तलवार आणि तत्सम धारदार शस्त्रे बाळगण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा तरुणांकडून धारदार शस्त्राद्वारे अनेकांना गंभीर दुखापती केल्याच्या घटना वारंवार निदर्शनास येत आहेत. धारदार शस्त्रे हातात घेतलेला फोटो फेसबुक, व्हॉट्सअप आधी समाज माध्यमांवर प्रसारित करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून समाज माध्यमांवर पोलिसांची करडी नजर आहे. अशा प्रकारचे फोटो, व्हिडिओ, समाज माध्यमांवर ठेवणाऱ्यांवर पोलीस कठोर कारवाई करत आहेत.
दरम्यान, इंदापूर येथे घडलेल्या प्रकरणी सदरची कारवाई पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, हवालदार ज्ञानेश्वर जाधव, प्रकाश माने, पोलीस नाईक सलमान खान, पोलीस कर्मचारी नंदू जाधव, विनोद लोखंडे यांनी केली.