breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#Covid-19: उस्मानाबादमध्ये हवेतून प्राणवायू निर्मितीचे पाच प्रकल्प!

उस्मानाबाद |

उस्मानाबाद जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. परिणामी प्राणवायूची प्रत्यक्ष मागणी आणि उपलब्धता यात मोठी तफावत निर्माण होत आहे. प्राणवायूच्या तुटवड्यातून निर्माण झालेला जटील प्रश्न मात्र आता लवकरच निकाली निघण्याची शक्यता आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण पाच ठिकाणी हवेतून प्राणवायूची निर्मिती करण्याचे प्रकल्प साकारले जात आहेत. त्यापैकी जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रकल्प कार्यान्वित झाला असून उर्वरित चार प्रकल्प महिनाभरात सुरू होतील असा विश्वास जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी व्यक्त केला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक ६ हजार ४८८ रुग्ण आढळून आले होते. तर २२७ मृत्यू नोंदविण्यात आले. मृत्यूचा हा दर ३.४९ टक्के एवढा होता. चालू वर्षात एकट्या एप्रिल महिन्यात तब्बल १४ हजार ५३० नवे रुग्ण रुग्ण आढळून आले आहेत, तर २७४ एवढे मृत्यू झाले आहेत. मृत्यूचे हे प्रमाण १.८८ टक्के असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने जाहीर केली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात पहिल्या लाटेत एकूण १६ हजार ९१० रुग्ण ६ महिन्यात बाधित झाले होते. तर ५७४ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला होता.दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात आजवर १८ हजार २०० रुग्ण केवळ दीड महिन्याच्या कालावधीत बाधित झाले आहेत. तर २९६ जणांचा यात जीव गेला आहे.

पहिल्या लाटेपेक्षा तिप्पट रूग्ण वाढ दुसऱ्या लाटेत उस्मानाबाद जिल्ह्यात आढळून आली आहे. परिणामी पाच मेट्रीक टन एवढी गरज असलेल्या प्राणवायूची मागणी प्रतिदिवस १४ ते १६ मेट्रीक टनवर जाऊन पोहचली. डॉक्टरांनी गंभीर रुग्ण वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेतील मृत्युदर १.५५ टक्के एवढ्यावर स्थिरावला आहे. गंभीर रुग्णसंख्येत सतत वाढ होत असल्याने दररोजच प्राणवायूचा तुटवडा निर्माण होत आहे. हैदराबाद, बेल्लारी, जालना, पुणे जेथून मिळेल तेथून प्राणवायू पदरात पाडून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाचीच दमछाक होत आहे. केंद्राच्या निधीतून जिल्हा रुग्णालयाच्या आवारात ५४ लाख रुपये किंमतीचा हवेतून प्राणवायू निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. यातून ६४ मोठे सिलेंडर प्राणवायू दररोज उपलब्ध होणार आहे.

उस्मानाबाद शहरासह अन्य तालुक्यातुनही मोठ्या प्रमाणात प्राणवायूची मागणी सातत्याने समोर येत होती. एकट्या उमरगा तालुक्यात दररोज ११० सिलिंडर एवढी आवश्यकता निर्माण झाली आहे. कळंब तालुक्यातील परिस्थिती देखील वेगळी नाही. त्यामुळे उस्मानाबादसह जिल्ह्यातील चार उपजिल्हा रुग्णालयात हवेतून प्राणवायू तयार करण्याचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार राज्य आपत्ती निवारण निधीमधून दोन प्रकल्पासाठी १ कोटी ७८ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. तर अन्य दोन प्रकल्पांसाठी जिल्हा नियोजन समितीमधून १ कोटी ७८ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. उमरगा, तुळजापूर, कळंब आणि परंडा येथे हे चार प्रकल्प पुढील महिनाभरात उभारले जाणार आहेत. एका प्रकल्पात दररोज १२५ मोठे सिलेंडर एवढा प्राणवायू हवेतून निर्माण होणार आहे.

सहा महिन्यातच प्रकल्पाची किंमत वसूल होईल –
सध्या एक हजार सिलिंडरसाठी अडीच लाख रुपये मोजावे लागतात. जिल्हा रुग्णालयाच्या प्रकल्पातून प्रतिदिवस ६५ आणि अन्य चार उपजिल्हा रुग्णालयातून प्रतिदिवस 5०० असे दररोज ५६५ प्राणवायू सिलिंडर उपलब्ध होणार आहेत. या गतीने पुढील सहा महिन्यात या पाचही प्रकल्पावर खर्च करण्यात आलेली रक्कम वसूल होईल आणि त्यांनतर पुढील अनेक दिवस आपल्याला कमी खर्चात मुबलक स्वरूपात वैद्यकीय उपयोगासाठी आवश्यक असलेला प्राणवायू जिल्ह्यातच उपलब्ध होणार असल्याचेही जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.

वाचा- निवडणुकीच्या मतदान बुथ धर्तीवर कोरोना लसीकरण केंद्र सुरू करावीत- संदीप काटे

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button