breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

राज्यात आठशे रोव्हर मशिनने होणार मोजणी

पुणे : राज्यातील जमीन मोजणीची प्रकरणे ही वेगाने आणि अचूक होण्यासाठी राज्याच्या जमाबंदी आयुक्तालयाकडून आठशे जमीन मोजणी यंत्रे (रोव्हर मशिन) खरेदी करण्यात येणार आहेत. उपग्रहाच्या आधारे प्राप्त होणाऱ्या तरंगलहरीद्वारे (सिग्नल) रोव्हर मशिनच्या माध्यमातून मिळणारे अक्षांश आणि रेखांश हे कायमस्वरुपी जतन होणार असल्याने जमिनींच्या बांधांवरून होणारी भाऊबंदकी कायमची मिटणार आहे. या पद्धतीने होणाऱ्या मोजणीमुळे बांध खोदून जमीन बळकावण्याचे प्रकार कायमचे थांबणार असून, नैसर्गिक आपत्तीमुळे मोजणीच्या खुणा गेल्या, तरी अक्षांश आणि रेखांशांच्या साह्याने पूर्वीच्या खुणा मिळू शकणार आहेत.

राज्यात यापूर्वी प्लेन टेबलने जमीन मोजणी करण्यात येत होती. त्यामुळे जमीन मोजणीसाठी विलंब लागायचा. सध्या इलेक्ट्रॉनिक टोटल मशिन (ईटीएस) यंत्रांच्या साह्याने मोजणी केली जाते. मात्र, या पद्धतीने होणाऱ्या मोजणीतील अचूकतेबाबत साशंकता निर्माण होते. रोव्हर मशिनमुळे जमीन मोजणी ही उपग्रहाच्या साह्याने केली जाणार असल्याने ही मोजणी अचूक असणार आहे.

याबाबत अतिरिक्त जमाबंदी आयुक्त आनंद रायते म्हणाले, ‘जमीन मोजणी ही वेगाने आणि अचूक होण्यासाठी आठशे रोव्हर मशीन खरेदी केल्या जाणार आहेत. त्याची टेंडर प्रक्रिया या महिनाअखेरीस सुरू केली जाणार आहे. यापूर्वी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून भूमी अभिलेख विभागाला सुमारे १०० रोव्हर मशिन खरेदी मिळाल्या आहेत. या मशिनद्वारे मोजणी करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे. प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. नवीन मशिन उपलब्ध झाल्यानंतर जमीन मोजणीची प्रकरणे ही वेगाने मार्गी लागणार आहेत’

‘रोव्हर मशिनसाठी राज्य सरकारकडून सुमारे ४० कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. मोजणी करण्यासाठी ७७ मोजणी स्थानके म्हणजे कंन्टिन्यूस ऑपरेशन रेफरन्स स्टेशन (कॉर्स) उभारली जाणार आहेत’ असे रायते यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सध्या राज्यात बांधाबांधांवरून भाऊबंदकी सुरू आहे. काही ठिकाणी बांध खोदून जमीन बळकावण्याचे प्रकार घडतात. मात्र, रोव्हर मशिनद्वारे जमिनीचे अक्षांश आणि रेखांश हे निश्चित होत असल्याने बांध खोदून दुसऱ्याच्या जमिनीमध्ये अतिक्रमण केले असल्यास ते समजू शकणार आहे. भूकंप, पूर किंवा अन्य कोणत्याही नैसर्गिक आपत्तींमुळे जमिनीच्या खुणा गेल्या, तरीही हद्द निश्चित करण्यासाठी अडचण येणार नाही.

…………………

रोव्हर मशिनने कशी होणार मोजणी?

– रोव्हर मशिनने मोजणी करण्यासाठी ‘सर्व्हे ऑफ इंडिया’च्या मदतीने मोजणी स्थानके (कॉर्स) उभारली जाणार

– उपग्रहाच्या आधारे प्राप्त होणाऱ्या तरंगलहरीद्वारे मोजणी करायच्या ठिकाणांचे अक्षांश आणि रेखांश दर्शविण्यात येणार

– कार्सद्वारे होणारी मोजणी ही रोव्हरमध्ये साठविली जाणार

– अक्षांश-रेखांशांवरून ऑटोकॅड संगणकप्रणालीचा वापर करून नकाशे तयार होणार

– रोव्हर मशिनने दहा एकर जमिनीची मोजणी अर्धा तासात पूर्ण करणे शक्य

…………………….

कोट

राज्यातील जमिनींची मोजणी ही रोव्हर मशिनने करण्यासाठी आठशे मशिन खरेदीची टेंडर प्रक्रिया या महिनाअखेरीस राबविण्यात येणार आहेत. त्यामुळे जमीन मोजणीची प्रकरणे वेगाने मार्गी लागतील; तसेच जमिनींवरून होणारे वादही कायमचे मिटणार आहेत. मोजणीसाठी राज्यभरात ७७ मोजणी स्थानके असणार आहेत.

आनंद रायते, अतिरिक्त जमाबंदी आयुक्त तथा भूमी अभिलेख विभागाचे अतिरिक्त संचालक

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button