लाचखोर पोलीस झाला डिजिटल; वाळू माफियांकडून ‘फोन पे’ वर स्वीकारली लाचेची रक्कम
![लाचखोर पोलीस झाला डिजिटल; वाळू माफियांकडून 'फोन पे'वर स्वीकारली लाचेची रक्कम](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/लाचखोर-पोलीस-झाला-डिजिटल-वाळू-माफियांकडून-फोन-पेवर-स्वीकारली-लाचेची.jpg)
नांदेड : वाळूच्या टिप्परवर कारवाई न करण्यासाठी हप्ता मागत नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याने लाचेची काही रक्कम चक्क ‘फोन पे’द्वारे स्वीकारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिवाजी पाटील असं या कर्मचाऱ्याचं नाव असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी पाटील याने वाळूच्या तीन टिप्परवर कारवाई न करण्यासाठी प्रत्येकी ७ हजार असे एकूण २१ हजार रुपये हप्ता मागितला होता. त्यापैकी ७ हजार रुपये पाटील याने स्वतःच्या फोन पे नंबरवर स्वीकारले. हप्ता देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. त्यानंतर विभागाने सापळा रचून शिवाजी पाटील याच्या वतीने १४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना मारोती कवळे या खासगी इसमास रंगेहाथ पडकले.
शिवाजी पाटील याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे तब्बल सव्वा दोन लाख रुपयांची रक्कम मिळाली. लाच घेण्यासाठी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याकडे सव्वा दोन लाखाची रक्कम मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शिवाजी पाटील नक्कीच सर्व हप्ता स्वतःसाठी घेत नसेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शिवाजी पाटील हा आणखी कोणासाठी हप्ता पोहोचवत होता का, याबाबतही तपास केला जावा, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.