#CoronoVirus:हिंगोलीत एसआरपीएफच्या आणखी 23 जवानांना ‘कोरोना’, रुग्णसंख्या 76 वर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/11-1.jpg)
हिंगोली : हिंगोलीत कालच्या दिवसात ‘कोरोना’ रुग्णसंख्येचा स्फोट झाला. हिंगोली जिल्ह्यात राज्य राखीव पोलिस दलाच्या 23 जवानांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित एसआरपीएफ जवानांची संख्या 70 वर गेली आहे. नव्याने आढळलेल्या 24 कोरोनाबाधित रुग्णांमध्ये एका नर्सचाही समावेश आहे.
एसआरपीएफचे 23 जवान ‘कोरोना’ पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल काल रात्री उशिरा आला. हे सर्व जवान मुंबईत कार्यरत होते. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित एसआरपीएफ जवानांची संख्या 70 वर गेली आहे. यापैकी एक जण जालन्याचा आहे. उर्वरित जवानांपैकी 34 जण मालेगाव, तर 35 जवान मुंबईत कार्यरत होते. हिंगोलीतील कोरोनाबधितांची संख्या गेल्या 24 तासात 52 वरुन थेट 76 वर गेली आहे.
हिंगोलीत पूर्वीपासून आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती असलेल्या कोरोनाग्रस्त एसआरपीएफ जवानाचा 14 दिवसांनंतरचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे. याशिवाय 24 वर्षीय परिचारिकेलाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. हिंगोली जिल्हा शल्यचिकित्सकाने याविषयी माहिती दिली.
हिंगोलीत कोरोनाबाधितांची संख्या 76 वर पोहोचली आहे. यापैकी एकाला डिस्चार्ज मिळाला आहे, तर 75 रुग्ण सध्या उपचाराधीन आहेत. याआधी, 1 मे रोजी एकाच दिवशी एसआरपीएफच्या 25 जवानांसह 26 कोरोनाग्रस्त सापडले होते. त्यानंतर कालच्या दिवसात हिंगोलीत मोठ्या प्रमाणावर नवे कोरोनाग्रस्त आढळले.
हिंगोली जिल्हा ‘कोरोना’मुक्त झाल्याची घोषणा 15 दिवसांपूर्वी झाली होती, मात्र इतक्या कमी कालावधीत रुग्णसंख्या फोफावून 75 च्या पार गेल्याने धाकधूक वाढली आहे. हिंगोलीवासियांचं कोरोनामुक्त झाल्याचं स्वप्न आधी एकदा विरलं होतं, आता रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने उलट चिंता वाढत आहे.