#CoronaVirus: संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांना आवर घालण्यासाठी आता वाहतुकीवर निर्बंध
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Untitled-321.png)
सध्या देशात वेगाने करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून वारंवार सुचना करूनही संचार बंदीचे उल्लघन होत असल्याने रायगड जिल्हा प्रशासनाने कठोर पावलं उचलण्यास सुरवात केली आहे. जिल्ह्यात आता दुचाकी, तीन चाकी, चार चाकीसह हलक्या आणि मध्यम वजनाच्या वाहनांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. पण, त्यानंतरदेखील रस्त्यावर वाहनांची रहदारी कमी झालेली नाही. परिणामी आता रायगड जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण क्षेत्रात आजपासून वाहनांवर निर्बंध आणण्यात आले आहेत.
रायगड जिल्ह्यातील नागरी क्षेत्र असलेल्या पनवेल, उरण, कर्जत, खालापूर, सुधागड-पाली, पेण, रोहा, अलिबाग, मुरुड, पोलादपूर, माणगांव, महाड, मसळा, श्रीवर्धन व तळा येथील नगरपरिषद, नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये वाहनांच्या वापरावर निर्बंध असणार आहेत. तसेच, रिक्षा, हलकी व मध्यम वाहने, प्रवासी टॅक्सी, अँप आधारीत वाहतूक सेवा पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहे.