#CoronaVirus: वाशिम जिल्ह्यात कोरोनाचे आणखी दोन रुग्ण
![20 people from UK come to India positive for new strain of corona virus](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/200320110619-coronavirus-animation-super-tease.jpg)
अकोला : वाशिम जिल्ह्यात आणखी दोन जणांचे करोना तपासणी अहवाल सकारात्मक आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या १३ झाली. वाशिम जिल्ह्यातील प्राप्त झालेल्या १९ अहवालांपैकी दोन अहवाल सकारात्मक, तर १७ अहवाल नकारात्मक आले. वाशिम तालुक्यातील बोराळा हिस्से येथील १५ वर्षीय युवतीला करोनाची लागण झाली आहे. ती करोनाबाधिताच्या नजीकच्या संपर्कातील आहे. मुंबई येथून मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथे आलेल्या कुटुंबातील एका आठ वर्षीय बालकाचा अहवालही सकारात्मक आला आहे. त्याच्या वडिलांचा अहवाल कालच नकारात्मक आला होता, तर आईचा अहवाल प्रतीक्षेत आहे.
मुंबई येथून पोहरादेवी येथे आल्यानंतर या कुटुंबाला संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. पोहरादेवी येथे येण्यापूर्वी हे कुटुंब नांदेड जिल्ह्याातील करोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आले होते. याची माहिती प्राप्त झाल्याने त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. दरम्यान, जिल्ह्यातील आतापर्यंत ४३९ नमुने तपासणी पाठविण्यात आले. त्यापैकी ५३ नमुने आज पाठवले. आतापर्यंत १३ अहवाल सकारात्मक आले असून, त्यातील दोघांचा मृत्यू, तर सहा जणांना उपचाराअंती सुट्टी देण्यात आली. पाच जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ३६६ अहवाल नकारात्मक आले असून, ६० नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.