#CoronaVirus: राज्यात २ हजार २८७ नवे कोरोना रुग्ण; १०३ जणांचा मृत्यू
महाराष्ट्रात आज २ हजार २८७ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्णांची एकूण संख्या आता ७२ हजार ३०० इतकी झाली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. तर दुसरीकडे आज १०३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची माहितीही समोर आली आहे.
राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात आज राज्यात २ हजार २८७ जणांची वाढ आहे. तर १०३ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे एक दिलासादायक बाब म्हणजे राज्यातील १ हजार २२५ रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत ३१ हजार ३३३ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याची माहिती टोपे यांनी दिली. तसंच राज्यात सध्या ३८ हजार ४९३ अॅक्टिव्ह रुग्ण असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच आज मृत्यू झालेल्यांमध्ये ६८ पुरूष आणि ३५ महिलांचा समावेश आहे. तर ५९ रुग्ण हे ६० वर्षे आणि उर्वरित ३९ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातील होते, अशी माहिती आरोग्य विभागानं दिली.
राज्यात आज 2287 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 72300 अशी झाली आहे. आज नवीन 1225 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 31333 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 38493 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak
— Rajesh Tope (@rajeshtope11) June 2, 2020
दरम्यान, राज्यातील रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण ४३.३३ टक्के एवढं झालं आहे. तर राज्यातील मृत्यू दर हा ३.४ टक्के इतका आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. तसंच राज्यात सध्या ५ लाख ७० हजार ४५३ जण होम क्वारंटाइन आहेत. राज्यातील संस्थात्मक क्वारंटाइन सुविधांमध्ये ७२ हजार ५३८ बेड्स उपलब्ध असून सध्या ३५ हजार ०९७ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये असल्याची माहितीही आरोग्य विभागानं दिली आहे.