#CoronaVirus: बीड जिल्हा रुग्णालयात कोरोना संशयित युवकाचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/2018_04_05_43469_1522927881._large-3.jpg)
करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्नांची शिकस्त करत असताना, मोठय़ा शहरांतून गावाकडे आलेल्या पाहुण्यांनी करोनाचा विषाणू आणल्याने चिंता वाढत चालली आहे. चार दिवसातच तब्बल ३७ बाधित सापडले. तर जिल्हा रुग्णालयात श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने दाखल झालेल्या संशयित रुग्णाचे घशाच्या स्त्रावांचे नमुने तपासणीसाठी घेताच तासाभरात त्याचा मृत्यू झाला. मृत्यू नेमका कशामुळे झाला हे तपासणी अहवाल आल्यास स्पष्ट होईल असे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे अहवालकडे लक्ष आहे. यापूर्वी एका करोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला होता.
बीड जिल्ह्यतील आष्टी तालुक्यातील एक युवक गुरुवारी रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयातील अलगीकरण कक्षात दाखल झाला होता. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीसाठी घेतले. मात्र तासाभरात त्याचा मृत्यू झाला. सदरील युवकावर जामखेड (जि. अहमदनगर ) येथे उपचार करण्यात आले होते. पण गावी परतल्यावर त्रास होऊ लागल्याने तो जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. युवकांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट नसले तरी अलगीकरण कक्षात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यू करोना विषाणूमुळे झाला की अन्य आजाराने हे स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यत सध्या करोना बाधित रुग्णांची संख्या २९ असून आणखी ४२ जणांच्या स्रावांचे नमुने लातूर येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. बाधित सर्वच रुग्ण मुंबई, पुणे येथून आलेले आहेत हे विशेष.
अहवाला नंतरच अंत्यविधीचा निर्णय
बीड जिल्हा रुग्णालयात करोना अलगीकरण कक्षात मृत्यू झालेल्या रुग्णाच्या अहवालानंतरच अंत्यविधीचा निर्णय होणार आहे. अहवाल सकारात्मक आला तर नियमानुसार प्रशासन अंत्यविधी करेल आणि नकारात्मक आल्यास नातेवाइकांकडे मृतदेह दिला जाईल असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. थोरात यांनी सांगितले.