#CoronaVirus: बारामतीत कोरोना चाचणी सुरू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/test-3.gif)
केंद्र सरकारने दिलेल्या मान्यतेनुसार बारामतीमध्ये करोना चाचणी सुरू झाली आहे. वैद्यकीय महाविद्यालयात उभारण्यात आलेली प्रयोगशाळा कार्यान्वित झाली असून बारामतीमध्येच अवघ्या १५ ते २० तासांमध्ये करोना रुग्णाचे निदान होणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीवकुमार तांबे यांनी ही माहिती दिली.
करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर बारामतीसह राज्यात सहा ठिकाणी कोविड १९ तपासणीसाठी विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळा (व्हीआरडीएल) सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली होती. त्यानुसार करोना संशयितांच्या तपासणीसाठी वैद्यकीय महाविद्यालयात प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. नागपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या डॉ. मीना मिश्रा यांनी या प्रयोगशाळेची पाहणी करून कोविड १९ च्या तपासणीसाठी योग्य सुविधा असल्याचा अहवाल दिला होता.
बारामती येथील संशयित रुग्णांना पुण्यातील तपासणी यंत्रणेवर अवलंबून राहावे लागत होते. संशयिताला पुण्याला तपासणीसाठी घेऊन जाणे तसेच तपासणीची प्रक्रिया वेळ खाऊ असल्यामुळे बारामतीमध्ये प्रयोगशाळा लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातल्याने पूर्ण झाली, असे डॉ. तांबे यांनी सांगितले. करोना संशयित आणि त्याच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब रुई येथील कोविड रुग्णालयात घेऊन नंतर ते वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत तपासण्यात येणार आहेत. त्यामुळे आता रुग्णांना अवघ्या १५ ते २० तासांमध्ये करोना तपासणीचा अहवाल मिळणार आहे. सुरुवातीला काही दिवस बारामती शहर आणि तालुक्यातील करोना संशयितांची तपासणी केली जाणार आहे. नंतर गरजेप्रमाणे आजूबाजूच्या तालुक्यातील रुग्णांची तपासणी करण्यात येईल, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.