#CoronaVirus: “फेसबुकमधून बाहेर या आणि फिल्डवर जा…”, म्हणणाऱ्याला सुप्रिया सुळेंनी दिलं हे उत्तर…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर कौटुंबिक हिंसाचारात वाढ झाली असल्याचं आपल्या वाचनात आलं असून त्याच मुद्द्यावर भाष्य करण्यासाठी आपण आलो असल्याचं त्यांनी सांगितलं. सुप्रिया सुळे यांनी यावेळी पुणे जिल्हा परिषदेने सुरु केलेल्या एका उपक्रमाची माहिती दिली. सोबतच कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी आपण काय करु शकतो यासंबंधी सल्ले, सूचना देण्याची विनंती केली. यावेळी त्यांनी फेसबुक युजर्सकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांचीही उत्तरं दिली.
यावेळी एका युजरने सुप्रिया सुळे यांनी फेसबुकमधून बाहेर या आणि फिल्डवर जा असं म्हटलं. त्यावर सुप्रिया सुळेंनी उत्तर देताना सांगितलं की, “फिल्डवर जाण्याची माझी खूप इच्छा आहे. मी नेहमी फिल्डवरच असते. आपण केलेलं काम हे उपलब्ध माहितीवरुन दिसंत फेसबुकवरुन नाही. सरकारने जे नियम, कायदे केले आहेत त्याप्रमाणे मला काम करावं लागतं. तुमची सूचना मला पडतीये. मलाही खूप इच्छा आहे”.
“राज्य आणि केंद्र सरकारने दिलेल्या सूचनांचं मी पालन करत आहे. नियम हे पाळण्यासाठी असतात, मोडण्यासाठी नाही. बाहेर जाण्याची परवानगी दिली जावी यासाठी मीदेखील अर्ज केला आहे, जेणेकरुन फिल्डवर काम करता येईल. ज्या गरजू लोकांना मदत लागते त्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून ती माहिती फेसबुकवरुन देत आहोत. काम करणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे आणी मी ती पार पाडत आहे,” असंही यावेळी सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. इतकंच नाही तर सुप्रिया सुळे यांनी युजरला अजून काही सूचना असतील तर त्यादेखील द्या असंही सांगितलं.




