#CoronaVirus: नव्या उद्योगांसाठी ४० हजार एकरपेक्षा जास्त जमीन राखीव ठेवणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/8-8.jpg)
लॉकडाउननंतर राज्यात जे नवे उद्योग येऊ इच्छितात त्यांच्यासाठी आपण ४० हजार एकरपेक्षा जास्त जमीन राखून ठेवत आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केली. याद्वारे त्यांनी राज्याच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी नव्या उद्योगांना राज्यात येण्याचे आवाहन केले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, “जगात सर्वकाही ठप्प झालेल असताना उद्या आपल्याला भरारी घ्यायची आहे. त्याकडे आपण आजिबात मागे पुढे पाहणार नाही. आमच्या शासनानं सुरु केलेल्या नव्या योजना आम्ही आमलात आणणार म्हणजे आणणारच. नवीन उद्योग आणण्यासाठी सध्या देशात स्पर्धा आहे. कोण काय नवं देतंय याकडे सर्वांच लक्ष आहे. त्यामुळेच महराष्ट्रात आपण ४० हजार एकरपेक्षा जास्त जमीन नवीन उद्योगधंद्यांसाठी राखून ठेवत आहोत. त्याचबरोबर जे नवे उद्योजक परदेशातून राज्यात येतील किंवा आपलेच काही उद्योजक नवे उद्योग स्थापन करण्यासाठी पुढे येणार असतील तर त्यांचे स्वागत आहे. हे उद्योजक जर ग्रीन उद्योग सुरु करणार असतील तर त्यांना प्रदुषण होणार नाही या अटीशिवाय आपण कुठल्याही अटीतटी ठेवणार नाही.” नवीन उद्योजकांनो या महाराष्ट्रामध्ये या असं आवाहन यावेळी त्यांनी केलं.
“त्याचबरोबर पुढचे काही दिवस हे नवे उद्योजक येणार असतील आणि त्यांना जमीन विकत घ्यायला परवडणार नसेल तरीही हरकत नाही. तुम्ही या तुम्हाला आम्ही भाडेतत्वार जमीन उपलब्ध करुन देऊ. उद्योगांसाठीच्या मुलभूत सुविधा तुम्हाला देतो. अटीतटीचा सामना तुम्हाला करावा लागणार नाही. या राज्यात नवं उद्योग पर्व आपण सुरु करु,” अशी सादही मुख्यमंत्र्यांनी नव्या उद्योजकांना घातली आहे.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “ग्रीन झोन आपल्याला करोनामुक्त ठेवायचा आहे. तसेच रेड झोनचं लवकरात लवकर ग्रीन झोनमध्ये रुपांतर करायचं आहे. अनेक ठिकाणी कामगारांची उणीव आहे. कारण अनेक कामगार निघून गेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील भुमिपुत्रांना माझं आवाहन आहे की, महाराष्ट्र सुरक्षित ठेवण्यासाठी जिथं ग्रीन झोन आहेत तिथं तुम्ही आता बाहेर पडलं पाहिजे. या उद्योगांना जर मनुष्यबळं कमी पडत असेल तर मोदींच्या भाषेत आत्मनिर्भत होत पुढे या इथं तुमची खऱ्या अर्थानं गरज आहे.”