#CoronaVirus:अकोला जिल्ह्यात एका दिवसात 32 पॉझिटिव्ह
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/2-14.jpg)
अकोला : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. अकोल्यातील जनतेसाठी शनिवारचा दिवस दिलासादायक ठरला होता. मात्र त्यानंतर आज (17 मे) रोजी तब्बल 32 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे अकोल्यातील जनतेसाठी दिलासा औटघटकेचा ठरला. अकोल्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 252 वर पोहोचला आहे.
रविवारी प्राप्त झालेल्या 169 संशयित रुग्णांच्या अहवालापैकी 32 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर अन्य 137 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर बुधवारी 13 मे रोजी मृत्यू झालेल्या मुर्तीजापूर येथील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मृत्यूंचा आकडा 17 वर पोहोचला आहे.
तर दुसरीकडे रविवारी 17 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे सदस्यस्थितीत 117 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या अकोल्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. शनिवारी केवळ दोन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने अकोलेकरांना किंचित दिलासा मिळाला होता. मात्र त्यानंतर रविवारी तब्बल 32 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे अकोलेकरांची चिंता वाढली आहे.
आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये 10 महिला आणि 22 पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये तारफैल भागातील 4, माळीपूरा- 4, खैर मोहम्मद प्लॉट- 4 आंबेडकर नगर- 3, ताजनापेठ- 3, अकोट फैल-3 रुग्ण आढळले आहेत. तर मुर्तिजापूर, अगरवेस, बिर्ला गेट, जठारपेठ, खरप, काळा मारोती, जुना आळशी प्लॉट, वर्धमान डुप्लेक्स राजपुतपुरा, रामदासपेठ पोलीस क्वाँर्टर, नायगाव, खोलेश्वर, शास्त्रीनगर या ठिकाणी प्रत्येक एक रुग्ण आढळला आहेत