Corona Virus : वर्ध्यात आदेश धुडकावले, जिल्हाधिका-यांनी दुकानं केली सील
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Wardha-corona-suspect.jpg)
वर्धा | महाईन्यूज
करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने वर्धा जिल्हा प्रशासनसह आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून करोनाबाधीत देशातून आलेल्या संशयित नागरिकांना घरी एकांतात राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, आदेशाचे उल्लंघन करत पाच नागरिकांनी दुकाने उघडली. तसेच, ते सार्वजनिक ठिकाणी वावरताना दिसून आले. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी त्या नागरिकांची दुकानं सील करण्याचे दिले आदेश दिले आहेत.
वर्धा जिल्ह्यात एकही करोनाबाधित रुग्ण नाही. मात्र, परदेशातून आलेल्या 26 लोकांवर पाळत ठेवली जात आहे. यापैकी 14 जणांना करोनाची लागण झाली नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं. तर 12 लोकांवर आरोग्य विभागाच्या देखरेखित पाळत ठेवण्यात आली आहे. सध्या एकाही संशयिताचा अहवाल पॉझिटिव्ह नसल्याची माहिती आहे.
वर्धा जिल्ह्यात काही नागरिक करोनाबाधीत देशातून परतल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. त्यांच्यावर पाळत ठेवून खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना घराच्या बाहेर न पडण्याचे आदेश दिले होते. हे आदेश धुडकावून त्यांनी नेहमीप्रमाणे आपली दुकाने उघडली. नियमांचे उल्लंघन केल्याच्यामुळे पाचजणांच्या दुकानांना जिल्हाधिका-यांनी सिल ठोकण्याचे आदेश दिले आहेत.
राज्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या 32
महाराष्ट्रात सर्वाधिक करोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर, केरळ हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. केरळमध्ये करोनाचे 22 रुग्ण आहेत. कुटुंब आणि आरोग्य कल्याण मंत्रालयाच्या सध्याच्या आकडेवारीनुसार, सध्या संपूर्ण देशात 107 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यातील 32 रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत.