शरद पवारांविरोधात वादग्रस्त पोस्ट; केतकी चितळेला पोलिस ताब्यात घेण्याची शक्यता
![शरद पवारांविरोधात वादग्रस्त पोस्ट; केतकी चितळेला पोलिस ताब्यात घेण्याची शक्यता](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/शरद-पवारांविरोधात-वादग्रस्त-पोस्ट-केतकी-चितळेला-पोलिस-ताब्यात-घेण्याची-शक्यता.jpg)
मुंबईः मराठी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर अक्षेपार्ह पोस्ट करणं चांगलंच अंगलट येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर कळव्यात केतकी चितळेवर पहिला गुन्हा दाखल झाला आहे. आज दुपारपर्यंत केतकीला पोलिस ताब्यात घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केतकी चितळे हिने शरद पवार यांच्यावर शुक्रवारी एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. पवारांवर अतिशय खालच्या भाषेत टीका केल्यानं सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही केतकीवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या महिल्या नेत्यांनीही ट्विटरच्या माध्यमातून केतकीला सुनावले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक शहर अध्यक्ष स्वप्नील नेटके यांनी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. केतकी चितळेनं ही पोस्ट केल्यामुळं पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. केतकीनं ही पोस्ट करुन दोन राजकीय पक्षांमध्ये द्वेषाची भावना, तेढ निर्माण करण्याचे कृत्य केलं आहे. शरद पवार यांना उद्देशून बदनामीकारक, मानहानीकारक पोस्ट केतकीनं केली, असं नेटके यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. कळवा पोलीसांनी केतकीविरोधात कलम ५०५(२), ५००,५०१, १५३ ए नुसार कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केतकीविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आज दुपारपर्यंत कळवा पोलिस तिला ताब्यात घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
- फेसबुक पोस्टनंतर केतकी चितळे ट्रोल
इतक्या खालच्या पातळीला जाऊन टीका करणं म्हणजे तिच्यात किती ठासून विकृती भरली आहे, याचा अंदाज येतोय, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. केतकीला जास्त महत्त्व देऊ नका. तिला अभिनय क्षेत्रात काम नसल्याने अशा वादग्रस्त पोस्ट करुन तिला चर्चेत यायचं असतं, असं दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलं आहे. आपलं वय किती, आपण बोलतो किती, आपल्या योग्यतेनुसार आपण बोलावं, आपली लायकी आहे का पवारसाहेबांवर बोलण्याची, असं म्हणत एका नेटकऱ्याने केतकीला सुनावलं आहे.