जितेंद्र आव्हाडांविरुद्ध पुन्हा शिवसेनेच्या नेत्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, राजकीय चर्चाना उधाण
मुंबई: मुख्यमंत्र्यांनी टाटा रुग्णालयाला म्हाडाच्या सदनिका देण्याच्या निर्णयाला स्थगिती दिल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. त्यानंतर 24 तासांत मुख्यमंत्र्यांकडून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्याबाबत खुद्द जितेंद्र आव्हाड यांनी माहिती दिली. टाटा रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांसाठी 100 सदनिका देण्यात येत आहेत. काही स्थानिकांनी विरोध केल्याचं आमदारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली. पण मुख्यमंत्र्यांनी मला बोलावून घेतलं आणि सांगितलं की, त्याच परिसरात आजच्या आज जागा शोधून निर्णय घ्या. 15 मिनिटात निर्णय झाला. बॉम्बे डाईंगमध्ये 100 सदनिका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आव्हाड यांनी त्यावेळी दिली होती.
शिवसेना विरुद्ध जितेंद्र आव्हाड असा संघर्ष पुन्हा एकदा बघायला मिळतोय. शिवसेना आमदारांनी जितेंद्र आव्हाडांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे तक्रार केली आहे. जितेंद्र आव्हाडांच्या कार्यशैलीवर शिवसेना नेते, आमदार आणि मंत्री नाराज आहेत. यामध्ये उद्योगमंत्री सुभाष देसाई, माजी आमदार विनोद घोसाळकर,राहुल शेवाळे, सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. याआधी आमदार अजय चौधरी यांनीदेखील तक्रार केली होती.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि आमदारांनी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात तक्रार केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यपद्धतीबाबत शिवसेनेच्या नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांकडे ही तक्रार करण्यात आली आहे. यापूर्वीही शिवडीचे आमदार अजय चौधरी यांनी आव्हाडांविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली होती. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी या तक्रारीची दखल घेत जितेंद्र आव्हाड यांनी टाटा रुग्णालयाला दिलेल्या सदनिकांच्या निर्णयाला स्थगिती दिली होती.