आयुक्तांचा ‘बेस्ट’ निर्णय; मुंबई पोलिसांना थेट मिळणार ५,२०० रुपये
![आयुक्तांचा 'बेस्ट' निर्णय; मुंबई पोलिसांना थेट मिळणार ५,२०० रुपये](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/आयुक्तांचा-बेस्ट-निर्णय-मुंबई-पोलिसांना-थेट-मिळणार-५२००-रुपये.jpg)
मुंबई : मुंबई पोलिसांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जूनपासून मुंबईतील पोलिसांचे पगार २७०० ते ५२०० रुपयांपर्यंत वाढले आहे. मात्र, या वाढलेल्या पगारानंतर आता पोलीस कर्मचाऱ्यांना बेस्टमध्ये तिकीट काढूनच प्रवास करता येणार आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या या निर्णयामुळे संपूर्ण पोलीस विभागात आनंदाचं वातावरण आहे.
एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कॉन्स्टेबल ते एएसआयचा २७०० ते ३२०० रुपये पगार दरमहा बेस्टच्या खात्यात जायचा. इतकंच नाहीतर पीएसआय ते एसीपी यांचा ४८०० ते ५२०० रुपयांपर्यंतचा पगार हा बेस्टच्या खात्यात जायचा. त्या बदल्यात पोलिसांना बेस्टच्या बसमधून शहरभर मोफत प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती.
दरम्यान, अनेक पोलिसांनी याविरोधात तक्रारी केल्या की, ते लोकल ट्रेनमधून प्रवास करतात किंवा त्यांच्याकडे खाजगी वाहने आहेत. त्यामुळे फार कमी लोक सरकारी किंवा वैयक्तिक कामासाठी बेस्टच्या बसमध्ये जातात. यामुळे त्यांच्या पगारातील बेस्टचा हिस्सा त्यांना दिला तर बरं होईल. यावरच पोलिस आयुक्तांनी आढावा घेऊन त्यानंतर नवा आदेश जारी केला आहे.
आधी किती रक्कम कापली जायची?
या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, अनेक वर्षांपूर्वी पोलीस कल्याण निधीतून पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रवासासाठी पैसे बेस्टला पाठवले जातचे. नंतर पोलिसांच्या खात्यातून ५० ते १०० रुपयांपर्यंत रक्कम कापली जाऊ लागली. हळूहळू रक्कम ५२०० रुपयांपर्यंत पोहोचली. पण यानंतर बेस्टमध्ये फुकट प्रवासाच्या नावाखाली आपले खूप पैसे बुडत असल्याचं लक्षात येताच पोलिसांनी याविरोधात तक्रारी केल्या. यानंतर अखेर पोलिस आयुक्तांनाही यावर योग्य निर्णय दिला आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.