“कोस्टल रोड नाही झाला तरी चालेल, पण…”; यशोमती ठाकूर यांनी ठाकरे सरकारलाच सुनावले खडे बोल
!["Coastal road will not work, but…"; Yashomati Thakur told the Thackeray government to speak out](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/Minister-Yashomati-Thakur.jpg)
मुंबई |
महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी महिला आयोगाच्या कार्यक्रमात महाविकास आघाडीला सुनावले आहे. एकवेळ कोस्टल रोडसाठी पैसे दिले नाहीत तरी चालेल पण मुले आणि महिलांसाठी पैसे द्यावेत यासाठी मी भांडते, अशा शब्दात मंत्री यशोमती ठाकूर यांनी त्यांच्या खात्याला निधी मिळण्यासाठीच्या संघर्षावर भाष्य केले आहे. कर्नाटकमध्ये २५ किलोमीटरवर शौचालये असतील तर आपल्याकडे का नाही असा सवाल देखील यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.
“मी पदभार स्विकारल्यापासून सातत्याने महिला धोरणासंदर्भात पाठपूरावा करत आहे. कर्नाटकमध्ये २५ किलोमीटरवर शौचालय आहेत. पण कोल्हापूरमध्ये नाहीत. त्यामुळे यामध्ये महिला आयोगाने लक्ष द्यायला हवं. महिलांच्या धोरणाला आपण फार महत्त्व देत नाही. त्यासंदर्भातील अंमलबजावणीला तर अजितबातच महत्त्व दिले जात नाही. मंत्रीमंडळात यशोमती ठाकूर फार आरडाओरडा करतात असे ऐकालया मिळते. आपण जर कल्याणकारी राज्य असल्याचे म्हणत असू तर कोस्टल रोड नाही झाला तरी चालेल पण महिला आणि मुलांना पैसे मिळालेच पाहिजेत. हा अट्टहास मी धरणारच,” असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.
“महाविकास आघीच्या पुढच्या तीन वर्षाच्या काळामध्ये आपण महिला आयोगाच्या व्यासपीठावरून कामे करु शकतो. ज्याद्वारे घरगुती हिंसाचार, कामाच्या ठिकाणी होणारा छळ यासंदर्भात ताकीद मिळू शकते,” असेही यशोमती ठाकूर म्हणाल्या. महाविकास आघाडीचे सरकार अजून बरेच कामे करु शकते असे सांगतांना शरद पवार आहेत म्हणून सरकार जोरात सुरु आहे, अशा शब्दात यशोमती ठाकूर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे कौतुक केले.