Pune Metro : पुणे मेट्रोची सिव्हिल कोर्ट ते रूबी हॉल चाचणी पूर्ण
![Civil Court to Ruby Hall trial of Pune Metro completed](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/Pune-metro-780x470.jpg)
पुणे : पुणे मेट्रोकडून काम जोरात सुरू असून शहारत विविध ठिकाणी बांधण्यात येणाऱ्या रेल्वे स्टेशनचे एक वेगळे महत्त्व आहे. काल पुणे मेट्रो कडून मेट्रोची सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक ते रुबी हॉल स्थानक अशी पहिली ट्रायल रन पूर्ण करण्यात आली असून लवकरच गरवारे ते रुबी हॉल आणि फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट अश्या १६ किलोमिटरचं काम हे लवकरच पूर्ण होणार आहे. तसेच शहरातील संपूर्ण मेट्रोच काम देखील प्रगतीपथावर होत असून लवकरच हे पूर्ण होणार आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक आणि वनाझ स्थानक ते गरवारे कॉलेज स्थानक ही मार्गिका २०२२ मध्ये प्रवाशांसाठी सुरू केल्यानंतर आता लवकरच फुगेवाडी स्थानक-सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक आणि गरवारे कॉलेज स्थानक-सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक-रुबी हॉल स्थानक या मार्गिका लवकरच प्रवाश्यांसाठी सुरू करण्यात येणार आहे.गरवारे स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक या मार्गीकेवर मेट्रो रेल्वेची चाचणी काही दिवसांपूर्वी घेण्यात आली.
त्याचप्रमाणे फुगेवाडी स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक मार्गावर चाचणी देखील घेण्यात आली होती. आत्ता आज सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक-मंगळवार पेठ (RTO)-पुणे रेल्वे स्थानक-रुबी हॉल स्थानक या मार्गावर चाचणी घेण्यात आली आहे. या तिन्ही मार्गीकेवरील कामे जवळपास संपुष्टात आली आहेत. उर्वरित कामे येत्या आठ ते दहा दिवसात पूर्ण झाल्यावर या मार्गीकांचे सी.एम.आर.एस निरीक्षण करण्यात येणार आहे. लवकरच सी.एम.आर.एस यांची मान्यता प्राप्त झाल्यानंतर प्रवासी सेवा या मार्गावर सुरू करण्यात येईल.
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी म्हटले आहे की, फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक आणि गरवारे कॉलेज स्थानक ते रुबी हॉल स्थानक या मार्गीकांची कामे जवळपास पूर्ण होत आली आहेत. या मार्गावर लवकरच प्रवासी सेवा सुरू करण्यात येणार आहे. तसेच शहरातील संपूर्ण मेट्रोच काम हे देखील जलद गतीने सुरू असून पुढील महिन्यात ते पूर्ण होणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या परवानगी नंतर ते लवकरच सुरू होणार आहे.