मराठा आरक्षणाच्या निकालाआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलवली तातडीची बैठक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/Uddhav-Thackeray-1-2.jpeg)
मुंबई – आज मराठा समाजासाठी महत्वाचा दिवस आहे. गेल्या 6 वर्षांपासून राज्याचं राजकारण मराठा आरक्षणाभोवती फिरत आहे. प्रत्येक पक्ष आपण मराठा समाजासोबत असल्याचं सांगत आहे. त्यातच आता प्रकरण न्यायालयाच्या पारड्यात गेल्यानं न्यायालय काय निकाल देईल? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. देशाच्या सर्वात मोठ्या न्यायालयात या प्रकरणी आज अंतिम सुनावणी होणार आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात आज सकाळी 10:30 वाजता अंतिम सुनावणी होणार असून आज या मुद्द्याचा सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. त्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सकाळी 9:30 वाजता तातडीची बैठक बोलावली आहे. त्यात मंत्रीमंडळ उपसमितीचे मंत्री सहभागी होणार आहेत. 26 मार्चला झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता. त्यावर आता मराठा आरक्षणाचं भवितव्य ठरणार आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात 15 मार्च आणि 16 मार्च दरम्यान सुनावणी पार पडली. तसेच 102 वी घटनादुरुस्ती राज्यांचे अधिकार नाकारत नाही, असं स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिलं आहे. या सर्व प्रकरणात मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी निकाल आरक्षणाच्या बाजूने लागेल, अशी आशा व्यक्त केली आहे.
दरम्यान, मराठा समाजाला एसईबीसी अंतर्गत आरक्षण दिलं गेलं. पण या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देत 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी केली होती. त्यामुळे आता आजच्या निकालावर मुख्यमंत्र्यासह संपुर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.