दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डीला अटक
नागपूर – दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांना अमरावती ग्रामीण क्राईम ब्रँचने बुधवारी उशिरा रात्री नागपूरहुन ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
श्रीनिवास रेड्डी याला ताब्यात घेण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी मंत्रालयातून रीतसर परवानगी घेतली. त्यानंतर बुधवारी नागपूर शहर पोलिसांच्या मदतीने रेड्डीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. मात्र याप्रकरणी अमरावतीच्या तपास अधिकारी पुनम पाटील यांनी मीडियाला माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
गुन्हा दाखल झाल्यापासून रेड्डी अटक टाळण्यासाठी लपून छपून फिरत होते. तर अमरावती पोलीस त्याचा जागोजागी शोध घेत होते. बुधवारी दुपारपासून त्यांचे लोकेशन नागपुरात दिसत असल्यामुळे अमरावती ग्रामीण पोलिसांची चमू नागपुरात दाखल झाली. त्यांनी गुन्हे शाखा तसेच स्थानिक सायबर सेलच्या मदतीने रेड्डीची शोधाशोध सुरू केली.
रात्री उशिरा शहरातील एका हॉटेल जवळ ते दिसल्यानंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईची नागपुरात जुजबी नोंद केल्यानंतर अमरावती ग्रामीण पोलिसांचे पथक त्यांना सोबत घेऊन गेले. तसेच दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात श्रीनिवास रेड्डी हे आरोपी असून सरकारने त्याच्यावर निलंबनाची कारवाईदेखील केली आहे.