मंदिरातील पुजारी अर्धनग्न का? ड्रेसकोड वादावर छगन भुजबळ आक्रामक
मुंबई : कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मंदिरात ड्रेसकोड लागू करण्यात आला होता. त्यानंतर भाविकांनी आक्षेप घेतल्यावर हा निर्णय चोवीस तासांमध्ये मागे घेण्यात आला. दरम्यान, यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी मंदिरातले पुजारी उघडे का असतात? असा सवाल उपस्थित केला आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, महाराष्ट्र मंदिर महासंघाने मंदिरांमध्ये वस्त संहिता लागू (ड्रेस कोड) करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तश्रृंगी देवी मंदिरात येणाऱ्या भाविकांना वस्तसंहिता लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यावर मंदिरांमध्ये वस्तसंहिता लागू करणे हा मूर्खपणा आहे.
हेही वाचा – प्री-वेडिंग शूटिंगवर मराठा समाजाची बंदी; वधू-वर परिचय मेळाव्यात ठराव
मंदिरात जाताना शाळेला सुट्टी आहे. तो हाफ पँट घालूनच मंदिरात जाणार ना? त्या मुलाला हाफ पँट घातली म्हणून बाहेर काढण्यात आलं. हा तर मूर्खपणा आहे. तुम्ही अगदी वाट्टेल तसे कपडे घालून मंदिरात जाऊ नये हे मलाही मान्य आहे. पण अगदी सगळ्यांनीच नियम पाळायचा असेल तर मंदिराच्या गाभाऱ्यात जे उघडेबंब असणारे पुजारी असतात त्यांनीही सदरा वगैरे घालावा. गळ्यात माळ घातल्यावर कळेल हा पुजारी आहे. पुजारीही अर्धनग्नच असतात का? धोतर नेसावं, तुळशीमाळा घालाव्यात, सदरा घालावा त्यावरून ओळखू येईल की हा पुजारी आहे. पण नाही ते उघडेच पाहिजेत, असं छगन भुजबळ म्हणाले.